सिंधुनगरी प्रतिनिधी
शिक्षक भरतीसाठी दोन लाख चाळीस हजार पात्र उमेदवार ठरले असून रखडलेली शिक्षक भरती औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय झाल्यावर होणार आहे. रखडलेल्या या शिक्षक भरतीमुळे राज्यातील सर्व शाळांना याची झळ पोचली आहे. रिक्त पदांची जास्त झळ ठाणे,रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील पाचही जिल्ह्यांना बसली आहे. सिंधुदुर्गात 1130 प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक रिक्त पदे असून त्यातील एक तृतीयांश म्हणजेच 300 शिक्षक, व पदवीधर शिक्षक कंत्राटी पदे भरण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सज्ज ठेवला आहे. असे असले तरी प्राथमिक शिक्षक भरती बाबत औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय व कंत्राटी शिक्षक पदे भरण्याबाबत राज्य शासनाचा निर्णय याकडे सर्व जिल्हा परिषदांचे लक्ष लागले आहेत.
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षणाचा झालेल्या खेळखंडोबा व अनेक लोकप्रतिनिधींचा आंदोलनाचा इशारा या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत नुकतीच झालेली व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीचा संदर्भानुसार राज्यातील शिक्षक भरती व कंत्राटी शिक्षक भरती याबाबतची माहिती दिली. येत्या आठवड्याभरात प्राथमिक शिक्षक भरती चा प्रश्न सुटेल या दृष्टीने शासनाने पाऊल उचललेले आहे. औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय होईल वा शिक्षक भरती चा प्रश्न मार्गी लागेल अशी शक्यता आहे. तोपर्यंत कंत्राटी शिक्षक पदे जिल्हा परिषदेच्या स्व निधीतून भरण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार केला आहे. दोनशे उपशिक्षक व 100 पदवीधर शिक्षक मिळून तीनशे कंत्राटी शिक्षक तीन महिन्याच्या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नेमण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. खंडपीठाचा निर्णय येत्या आठवडाभरात होईल अशी अपेक्षा असल्याने आठ दिवसात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होईल त्यामुळे कंत्राटी पदे भरण्या बाबत प्रशासनामध्ये संभ्रमावस्था आहे.
आंतरजिल्हा बदलीने 455 शिक्षक या जिल्ह्यातून कार्यमुक्त झाले आहेत त्यामुळे उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांची मिळून 1130 पदे रिक्त झाली आहेत. यातील 50 टक्के पदे भरण्या बाबत शासनाचे धोरण आहे. खंडपीठाच्या निर्णयानंतर पात्र शिक्षकांमधून व रोस्टर आरक्षणा नुसार भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.जिल्ह्यात वीस विद्यार्थी पटसंख्येच्या आतील जवळपास 800 च्या वर शाळा असून या शाळांवरील शिक्षक पदे कमी होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात संच मान्यतेचा व आठवड्याभरात रोस्टर मान्यतेचा कार्यक्रम होणार आहे. कमी पटसंख्येच्या शाळा व त्यावरील शिक्षक भरती याबाबत शासनाचे धोरण निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यातील किती पदे वाढतील किंवा किती पदे कमी होतील याचीही निश्चिती होणार आहे. सध्यातरी शासन निर्णय होताच 300 कंत्राटी शिक्षक नेमण्यासाठी शिक्षण विभागाने पूर्वतयारी पूर्ण केली आहे. असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी यासंदर्भात बोलताना माहिती दिली.