लांजा तालुक्यातील वाकेड घाटीमध्ये महामार्ग खचला

महामार्ग खचल्याने जुन्या मार्गावरून पर्याय वाहतूक सुरू

 लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील वाकेड घाटातील तीव्र उताराच्या वळणाच्या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग खचण्याची घटना सोमवारी ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम होवून वाहतूक ठप्प झाली होती . प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली होती.

मुंबई गोवा महामार्गाचे ग्रहण सुटता सुटेना अशी परिस्थिती होत आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका हा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, प्रवाशांना वारंवार बसत आहे. अशाच पद्धतीने सोमवारी 3 जुलै रोजी वाकेड घाटी येथे महामार्ग खचल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्याने वाकेड घाटात महामार्ग खचला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

त्यनंतर ही बाब लक्षात आल्यानंतर लांजा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तर महामार्ग खचल्याने नव्याने वाहतूक सुरू असलेल्या महामार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आणि जुन्या मार्गावरून पुन्हा एकदा पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर महामार्ग ठेकेदार कंपनीकडून या ठिकाणी जेसीबी द्वारे खचलेल्या महामार्गाची दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. खचलेल्या महामार्गाच्या ठिकाणी माती व दगड भराव टाकून हा महामार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मात्र महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी नवीन मार्ग बंद करून जुन्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करून देण्यात आली होती.

दरम्यान या घटनेमुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे