वेंगुर्ले-पेंडूर येथील अनधिकृत कातभट्टीवर वनविभागाचा छापा…

कातवडीसह खैराचे लाकूड जप्त

वेंगुर्ले : प्रतिनिधी : वेंगुर्ले-पेंडूर येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या जय गणेश या कातभट्टीवर वन विभागाच्या पथकाने छापा टाकला. यात सुमारे ९.९६ टन कातवडीसह ५५ हजार घनमीटर खैर लाकूड जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने केली. दि. १८ मे २०२३ रोजीच्या सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील मौजे डेगवे येथील शासकीय जंगलातील खैर वृक्षतोडीतील फरारी मालाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

वनविभाग सावंतवाडीचे पथकाला पेंडूर ता. वेंगुर्ला येथील जय गणेश कात इंडस्ट्रीज येथे पुन्हा शासकीय जंगलातील खैर किटा आणला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने काल दि. ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने कातभट्टी व परिसराची अचानक धाड टाकून तपासणी केली असता अवैध विनापासी खैर किटा ५४.३३३ घ. मी. आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला. तसेच कातभट्टी अटी शर्तीचा भंग केल्याने तयार कातवडी सुमारे ९.९६ टन जप्त करून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२ब) तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ५३,६३अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी वनविभागाकडून आवाहन करण्यात आले कि ‘लाकूड मालाची अवैध विनापासी वाहतूक करणे, कातभट्टी अटी शर्तींचे उल्लंघन करणे हा वनगुन्हा असून भारतीय वन अधिनियम १९२७ चे विविध कलमांचे तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ मधील नियमांचे उल्लंघन असुन तो दंडनीय अपराध आहे.’
सदर कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री .एस एन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मदन क्षीरसागर वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी व श्री. अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ तथा सहाय्य्क वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) वनविभाग सावंतवाडी यांनी श्री. सावळा कांबळे वनपाल मठ, पृथ्वीराज प्रताप वनपाल आजगाव, वनरक्षक वि. श. नरळे, सूर्यकांत सावंत, आप्पासो राठोड, वैशाली वाघमारे, वनमजूर श्री. इब्रामपूरकर, श्री. पाडावे, राहुल मयेकर यांनी यशस्वी केली.