Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंमुळे लांबल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंविषयी देवेंद्र फडणवीसांनी केले गौप्स्फोट

मुंबई : उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबई महापालिकेच्या निवडणुका लावण्यात याव्या असं वारंवार बोलतात. मात्र या निवडणुका आम्ही लांबवल्या नसून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळेच लांबल्या आहेत, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेला २९ जून रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. ही मुलाखत काल सायंकाळी दाखवण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही निवडणुका लांबवल्या नाहीत. निवडणुका व्हाव्यात असं आम्हालाही वाटतंय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने भरपूर याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत, आरक्षणाबाबतची एक याचिका सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहेत आणि स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकत नाहीत. ज्यावेळी स्टेटस को हटेल आणि निकाल येईल तेव्हा निवडणुका होतील. उद्धवजी बोलतात की तुम्ही निवडणुका का घेत नाही तेव्हा मला आश्चर्य वाटतं. तुम्ही याचिका दाखल केल्या आहेत, तुम्ही त्या मागे घ्या. स्टेटस को हटेल. दोन्ही बाजूंनी का बोलता? हे राज्य सरकारच्या हातात नाही. सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील.”

खंजीर खुपसणारे उद्धवजी तर दुहेरी खेळी शरदजींची

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या साटंलोटं झालं होतं, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. ते म्हणाले, “उद्धवजींनी धोका दिला. आम्हांला बहुमत मिळालं होतं. पण उद्धवजींच्या लक्षात आलं की आमच्याकडून हटून दुसर्‍या दोन पक्षांसोबत ते गेले तर सरकार स्थापन करता येईल. आमच्याकडे १० जागा जास्त असत्या तर उद्धवजी हे करु शकले नसते. याच महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बातचीत सुरु केली. स्पष्ट बहुमत मिळालेय तरी १० दिवस ते आम्हाला टाळत होते. तेव्हाच आमच्या लक्षात आले की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्याचे ठरविले आहे, असे फडणवीस म्हणाले.

तेव्हाच राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधला. आपण एकत्र आले पाहिजे, असे सांगितले. यामुळे आम्ही शरद पवार यांच्यासोबत बैठक केली. महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देण्याचे शरद पवारांनी मान्य केले. भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येतील. परंतु, एका सकाळी शरद पवार मागे हटले. तेव्हा अजित पवारांनी म्हटले की एवढे पुढे गेल्यावर मी तरी मागे येऊ शकत नाही, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. विरोधकांच्या एकत्र येण्यावर जेव्हा चर्चा सुरु होती, शरद पवार तेव्हा गॉड फादरच्या भूमिकेमध्ये होते. परंतु, स्वास्थ्याच्या कारणामुळे ते आता थोडे मागे हटले आहेत, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे, तर शरद पवार दोन्ही बाजूंनी खेळले आहेत.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालं होतं डील

निवडणुकीआधी उद्धवजी आणि शरदजींमध्ये एक डील झालं होतं. शरद पवारांनी उद्धवजींना म्हटलं की जर भाजपला १३० जागा मिळाल्या तर त्यांना तुमची गरज राहणार नाही. त्यामुळे भाजपविरोधीच्या जागांवर तुम्ही आम्हाला मदत करा आणि आम्ही तुम्हाला करतो, अशा प्रकारे दोघांनी समजुतदारी केली आणि ती निवडणुकीतही दिसून आली.

समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरुन ठाकरेंवर टीका

पंतप्रधान मोदींनी समान नागरी कायद्याचा उल्लेख करताच मुस्लिम लॉ बोर्डाचे सदस्य सगळ्यात आधी उद्धव ठाकरेंना भेटायला गेले असं फडणवीस म्हणाले. अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांपैकी कोणाकडे ते गेले नाहीत. कारण एक नवी आणि अंशतः धर्मनिरपेक्ष संस्था या सदस्यांना उद्धव ठाकरेंमध्ये दिसते, अशा शब्दांत फडणवीसांनी टीका केली.

मनपा निवडणूक शिवसेनेसोबत लढणार

“महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेच्या सोबत लढणार आहोत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच महाविकास आघाडी स्ट्रॅटेजिक अलायन्स करेल. याचा अर्थ म्हणजे काही ठिकाणी युती केली तर त्यांचं नुकसान होईल आणि आम्हाला फायदा होईल. अशा ठिकाणी ते स्वतंत्र लढतील, असं ते म्हणाले.

मुंबई १५० चा नारा कायम, मुंबई जिंकणारच

“जेपी नड्डा यांनी दिलेला मुंबई १५० हा आमचा नारा कायम आहे. मुंबई जिंकणार आणि चांगल्या पद्धतीने जिंकणार. हिंदुत्त्व हा निवडणुकीचा मुद्दा नाही. ती आमची विचारधारा आहे. आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत. त्यावर आम्ही मतं मागत नाही, विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतो. मागील निवडणुकीतही आम्ही मोठी मुसंडी मारली होती. त्यावेळी संपूर्ण प्रचारातील भाषणात मी विकासाचा मुद्दा मांडत होतो,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.