कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट
मुंबई : मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. (Rain updates) या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. ठाणे, पालघर आणि कोकणातही मुसळधार पाऊस सुरू आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या पावसामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे.
दरम्यान, राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाची बॅटिंग सुरु असली तरी राज्याच्या काही भागात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे शेतकरी कासावीस झाला आहे. या भागातील शेतकरी निरभ्र आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटून गेला आहे. तरीदेखील पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचा खरिप हंगाम वाया जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.













