कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात सिद्धनेर्ली नदीकिनारी चक्क चार मानवी कवट्या (Human Skull) सापडल्या असून त्याखालचा सांगाडा मात्र गायब आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विनासांगाडा कवट्या आढळल्याने हा अंधश्रद्धेतून केल्या जाणाऱ्या अघोरी कृत्याचा प्रकार असावा असे बोलले जात आहे. नदीकिनारी पोहण्यासाठी गेले असता लोकांना कवट्या आढळून आल्या.
दरम्यान, गावच्या पोलीस पाटलांनी घटनेची दखल घेत तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला आणि कवट्या ताब्यात घेतल्या.
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे नदीचे पात्र बऱ्यापैकी उघडे झाले आहे. त्यामुळे नदीपात्रात असलेल्या कवट्याही दिसून आल्या. दरम्यान, कवट्या आढळून आल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी दुधगंगा नदीपात्रात गर्दी केली. कवट्या पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धनेर्री परिसरात काही दिवसांपूर्वी एक परप्रांतीय भोंदू बाबा आढळून आला होता. त्यानंतर हा बाबा गायब झाला. मात्र, आता या कवट्या आढळून आल्यानंतर या बाबाचेच काही अघोरी कृत्य तर नसावे ना? अशी चर्चा परिसरात रंगली आहे.