भारत शिक्षण मंडळाची वैचारिक मुळे खोलवर- रमेश कीर

नवीन इमारतीच्या बांधकामास सुरवात

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळात अच्युतराव, शंकररावांचे संस्कार खोलवर रुजले आहे. या दोघांबद्दल मला खूप आदर आहे. वैचारिक मुळे भक्कम आहेत व तीच आज काळाची गरज आहे. ध्येयाने प्रेरित होणारी ही संस्था आहे. भारत शिक्षण मंडळाला सुमारे सव्वाशे वर्षांची मोठी परंपरा आहे. तसेच बहुजनांच्या शिक्षणाचा पायंडा संस्थेने आजही सुरू ठेवला आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. रत्नागिरीमध्ये आता बऱ्यापैकी शैक्षणिक स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे अधिक मोठे होण्यासाठी खूप संधी आहे, असे प्रतिपादन उद्योजक तथा देणगीदार रमेश कीर यांनी केले.

भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये नवीन इमारत बांधण्याच्या कामाचा प्रारंभ आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पायाभरणीचे यजमानपद मंडळाच्या कार्याध्यक्ष सौ. नमिता कीर आणि रमेश कीर दांपत्याने भूषवले. सकाळी त्यांच्या हस्ते गणेशपूजन, पायाभरणीकरिता पूजा झाली. त्यानंतर जुन्या कीर सभागृहाच्या जागेवर शिलान्यास समारंभ करण्यात आला.

यानंतर कॅ. सुभाषचंद्र सभागृहात छोटेखानी कार्यक्रम झाला. कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी प्रास्ताविक करताना संस्थेची ध्येय, धोरणे सांगताना नवीन इमारतीबद्दल माहिती सांगितली. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, सौ. नमिता कीर, रमेश कीर, भारत शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये, कार्यवाह सुनील तथा दादा वणजु, मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, उपस्थित होते. पालिकेचे बांधकाम अभियंता श्री. जाधव, इमारतीचे बांधकाम करणारे मिलिंद यादव, ठेकेदार आदींचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात नंदकुमार साळवी म्हणाले, काळानुरूप इमारत बांधणार आहोत. दोन-तीन वर्षांत इमारत पूर्ण होईल. समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देतोय. याचे समाधान वाटते. त्यामुळे मुले हक्काने येथे येतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मानसी चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास संस्था कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.