कारिवडे नदीपात्रात आढळला महिलेचा जखमी अवस्थेतील मृतदेह

Google search engine
Google search engine

 

मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय

सावंतवाडी । प्रतिनिधी : कारिवडे येथे नदीपात्रात महिलेचा जखमी अवस्थेतील मृतदेह तरंगताना आढळून आला. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लक्ष्मी बाबली मेस्त्री ( ६०, रा. पेडवेवाडी, कारीवडे ) असे तिचे नाव असून ती गुरुवारी दुपारपासून बेपत्ता होती. शुक्रवारी सकाळी नदीपात्रात तिचा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आला. मगरीच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त होत असला तरीही शवविच्छेदन अहवालानंतरच नेमका मृत्यू कशाने झाला याची माहिती मिळणार असल्याचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

याबाबत सदर मृत महिलेच्या मुलाने सावंतवाडी पोलीस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी मेस्त्री या गुरुवारी दुपारपासून घरातून बाहेर पडून गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरात न परतल्याने त्यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या अंगावरील खोल जखमा पाहता नदीपात्रातील मगरींनी त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

स्थानिकांना सदर महिलेचा मृतदेह नदी पात्रात निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांना याबाबतची खबर दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही प्राचारण करण्यात आले.

वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत, वनरक्षक सागर भोजणे, महादेव गेजगे यांच्यासह पोलीस हवालदार मनोज राऊत, कांडरकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

त्यानंतर मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. दुपारी शवविच्छेदनाअंती तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत लक्ष्मी मेस्त्री यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. कारिवडे पेडवेवाडी येथील महादेव मेस्त्री यांची त्या आई होत.