शतकोत्तर वाटचाल विशेष सन्मान पुरस्कारावरही बँकेची मोहर
राजापूर (प्रतिनिधी): आपल्या सर्वोत्कृष्ठ कामगिरीने कोकणच नव्हे तर राज्यभरात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या राजापूर अर्बन को. ऑप. बँकेने पुन्हा एकदा यावर्षी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई तर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. यावर्षी या पुरस्कारांमध्ये बँकेने डबल धमाका साधला आहे. या संस्थेकडून राजापूर अर्बन बँकेला सन २०२१-२२ साठी आपल्या बँकेची कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार’ तर शतकमहोत्सव साजरा करणारी कोकणातील बँक म्हणून बँकेला या वर्षीचा शतकोत्तर वाटचाल विशेष सन्मान पुरस्कार जाहिर झाला आहे.
तसे पत्र दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर व उपाध्यक्ष वसंत विश्वासराव घुईखेडकर यांच्याकडून बँकेला प्राप्त झाला आहे. बँकेने पुन्हा एकदा या पुरस्कारांवर आपली मोहर उठविल्याबद्दल बँकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. २३ सप्टेंबर २०२३ रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थित या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
कोकण विभागातून ‘रु.२५० कोटी ५०० कोटीपर्यंत ठेवी असणाऱ्या बँका’ या गटातुन बँकेला बँकेची कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार’ जाहिर झाला आहे. तर बँकेने शतकमहोत्सव साजरा करून यशस्वी शतकोत्तर वाटचाल केल्याबद्दल ‘बँकेच्या शतकोत्तर वाटचालीबाबत विशेष गौरव पुरस्कार’ या गुणवत्ता मानांकनासाठी हा पुरस्कार बँकेला जाहिर झाला आहे.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे वसंतदादा पाटील हे कृतीशील व्यक्तिमत्व होते. प्रभावी मुख्यमंत्री ते सहकार महर्षी असा त्यांचा प्रवास होता. त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार लक्षणीय आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास, कृषी उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या नावाने आपल्या बँकेला गौरविताना आंम्हाला आनंद होत असल्याचे संस्थेने नमुद केले आहे.
लोकसेवेतला नितळपणा, विकासाचा आधुनिक विचार घेऊन सर्वोत्तम आणि आधुनिक सेवा देऊन ग्राहकसेवेचा आदर्श वस्तुपाठ आपल्या बँकेने निर्माण केला आहे, हे निश्चितच गौरवास्पद आहे. सहकार संस्कृतीच्या विकासासाठी नव्या आव्हानांचा वेध घेऊन समाजातील तळागाळातील जनतेसाठी आपले संघटीत कार्य नवा कृतीशील विचार देणारे आहे. नवी उत्तुंग ध्येय घेऊन भविष्यातही आपल्या बँकेची अशीच विकासात्मक राहील, असा आम्हाला ठाम विश्वास व्यक्त करत संस्थेने राजापूर अर्बन बँकेचा गौरव केला आहे. आपल्या बँकेची, कामाची गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुखता ह्या दोन गोष्टी बँकेची शक्तीस्थळ आहेत. त्याच गुणांवर बँकेची घोडदौड वेगाने सुरु आहे असे नमुद केले आहे.
यापुर्वीही राजापूर अर्बन बँकेने कै. वसंतदादा पाटील पुरस्कारावर आपली मोहर उठविली आहे. यावेळी तर दोन पुरस्कार बँकेला प्राप्त झाले आहेत. याबद्दल बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.
समस्त सभासदांचा गौरव- हनिफ मुसा काझी अध्यक्ष
राजापूर अर्बन बँकेला प्राप्त झालेले हे दोन्ही पुरस्कार समस्त सभासदांचा गौरव असल्याची प्रतिक्रीया बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी दिली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांचे सुयोग्य नियोजन व मार्गदर्शन, अधिकारी व कर्मचारी यांचे परिश्रम सर्व आजी माजी संचालकांचे भक्कम पाठबळ आणि सभासदांचा विश्वास याचीच ही फलश्रृती असल्याचे काझी यांनी सांगितले.
————————————————————-