कळंबस्ते फाटा येथे महामार्गावर निवाराशेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय- ऋषिकेश शिंदे

चिपळूण | प्रतिनिधी : तालुक्यातील कळंबसते फाटा येथे खेड मार्गावर प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहेत. राज्य परिवहन मंडळाने तात्काळ याची पाहणी करून निवाराशेड उभारावी, अशी मागणी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष ऋषिकेश मनोज शिंदे यांनी केली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भर उन्हात तर पावसाळ्यात भिजत प्रवाशांना एस.टी.ची प्रतिक्षा करावी लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते फाटा येथे बस थांबा आहे. मात्र, निवारा शेड नसल्याने प्रवाशांची विशेषत: लोटे औद्योगिक कंपन्यांकडे जाणाऱ्या कामगार वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून निवारा शेड उभारावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे, शिवाय चर्चाही करण्यात आली आहे. मात्र, या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. निवारा शेड नसल्याने कामगारांना ,विद्यार्थ्यांना व परिसरातील ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा बस थांबा लक्षात येत नसल्याने चालक गाडी मागेपुढे थांबवत असल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष ऋषिकेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सध्या पावसाळा सुरू झाला आहे तसेच महामार्गाचे कामही सुरू असल्याने याठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाले आहे. अरुंद असलेल्या सर्विस रस्त्यावर बस थांबा येथे उभे राहणे अवघड होत आहे. कळंबस्ते फाट्यावर दररोज २५ ते ३० कर्मचारी लोटे एमआयडीसी येथे तीन शिफ्टला काम करतात. प्रवासी शेड नसल्याने या कामगारांची तारांबळ उडत आहे. एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच एसटी बसच्या फेऱ्या अनियमित असल्याने विद्यार्थी, कर्मचारी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. कळंबस्ते व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ या बस थांबावर येत असल्याने वर्दळ वाढत आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य परिवहन मंडळाने तात्काळ याठिकाणी निवारा शेड उभारावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा श्री. शिंदे यांनी दिला आहे.