दापोलीची राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोबत?

उद्याच्या दोन्ही पवारांच्या बैठकिकडे सर्वांच्या नजरा

दापोली | प्रतिनिधी : गेल्यावर्षी याच महिन्यात महाराष्ट्रात पहिला मोठा राजकीय भुकंप झाला होता. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचेकडे फारकत घेत भाजप बरोबर आपली चुल मांडली होती. आता बरोबर एक वर्षानी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी फारकत घेत भाजप बरोबर हातमिळवणी करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांचे सोबत ९ मंत्र्यांनी नुकतीच मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत.

या निर्णयानंतर दापोली तालुक्यातील कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होत. दापोली मधील राष्ट्रवादीचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या सोबतच कायम राहण्याचा मोठा निर्णय घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते दापोली तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर हे खासदार सुनील तटकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून उपमुख्मंत्री अजितदादाना व तटकरे यांना बळ देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या होणाऱ्या दोन्ही बैठकांना कोकणातील कोण पदाधिकारी उपस्थित राहतात हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

दापोलीत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या मंगळवारी दापोलीत झालेल्या बैठकीत महत्वाची चर्चा करण्यात आली आहे. बुधवारी अजितदादा पवार यांनी सकाळी 11 वाजता मुंबईत बोलवलेल्या बैठकीला दापोली, खेड व मंडणगड येथील पदाधिकारी कार्यकर्ते जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्याआधी पनवेल येथे दापोली ,खेड , मंडणगड येथील पदाधिकारी व कार्यकर्ते महत्त्वाची चर्चा करणार आहेत व त्यानंतर अंतिम निर्णयाची दिशा ठरण्याचीही शक्यता आहे अशी माहिती राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.