भाजपा सरपंच संघटनेच्या बैठकीत कामे सुचविण्यासाठी केल्या सूचना
सरपंच उपसरपंच यांनी संघटनेच्या कामात सक्रीय सहभाग घ्यावा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बजेटमधून गतवर्षी रस्ते विकासासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. मात्र, यावर्षी तब्बल १ हजार कोटींची तरतूद व्हावी अशी अपेक्षा असून यासाठी सरपंच व स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे सुचवली जावीत, अशा सूचना आज झालेल्या सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
भाजपा सरपंच संघटनेच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, सरपंच संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक नाईक, भाजपा किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी संघटनेच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा अशा सूचना सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन तसेच आमदार खासदार निधीसाठी कामे सुचविताना देखील सरपंच उपसरपंच तसेच स्थानिक भाजपा शक्ती केंद्रप्रमुख अथवा बुथ अध्यक्ष यांना विश्वासात घेऊन ती सुचवली जावेत अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी @ ९ च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे व केंद्राच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात झालेली विविध विकास कामे तसेच केंद्र सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय त्याचप्रमाणे लोकांसाठी मिळणाऱ्या सुविधा याबाबत जनतेपर्यंत पोहोचून त्यांना त्याची माहिती देण्यात यावी. यासाठीही सरपंच उपसरपंच यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मिळून काम करावे अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्याची माहिती राजन तेली यांनी यावेळी दिली.
तसेच यावेळी सरपंच उपसरपंच यांना उद्भवणाऱ्या समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या गेल्या. विकास कामे करताना त्याचप्रमाणे पंधरावा वित्त आयोग साठीची अंदाजपत्रके वेळेत न मिळणे अशा प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. याबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहितीही यावेळी राजन तेली यांनी दिली.