वारकरी, शेतकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग
वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. हे जनतेत पोहोचविण्याच्या प्रमुख उद्देशाने ‘वृक्षदिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या वृक्षदिंडी मध्ये किलबिल ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी, शेतकरी यांच्या वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सकाळ पासून सुरू असलेल्या संततधार पावसातदेखील मोठ्या उत्साहाने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगाच्या ओळी म्हणत विविध वृक्षसंवर्धनाच्या घोषणा देत विद्यालयाच्या प्रांगणापासून संपुर्ण बाजारपेठेत विद्यार्थ्यांनी ‘वृक्षदिंडी’ काढली व सर्व जनसमुदायाला वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. वृक्षसंवर्धनाच्या घोषणांसह वैभववाडी बाजारपेठेत वृक्षदिंडी उत्साहात संपन्न झाली.
वैभववाडी तालुका सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी यांच्या वतीने या वृक्षदिंडी साठी पालखी व शालेय परिसरात तसेच विद्यार्थ्यांच्या घराशेजारील परिसरात वृक्षलागवड व्हावी या हेतूने अनेक प्रकारची झाडे उपलब्ध करून देण्यात आली होती. शिवाय सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडीचे अधिकारी व कर्मचारी देखील या दिंडीत सहभागी झाले होते. वृक्षदिंडी मधील सजवलेली पालखी तसेच पारंपारिक वेशभूषेत तुळशीचे रोप घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थीनींनी व वारकरी वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आत्मा कमिटीचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी वृक्षदिंडीचे पुजन करून व श्रीफळ वाढवून दिंडीची सुरुवात झाली. शालेय परिसरात सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी चे अधिकारी व कर्मचारी, प्रशालेचे शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आत्मा कमिटीचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सामाजिक वनीकरण विभागचे वनक्षेत्रपाल विनोद वेलवाडकर, वनपाल प्रकाश पाटील, कणकवली चे वनपाल शिवाजी इंदुलकर, वैभववाडीचे वनरक्षक संदीप कुंभार, विद्या जाधव, वनमजूर तात्या ढवण तसेच प्रशालेचे सांस्कृतिक प्रमुख विजय मरळकर, पंडीत पवार, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.