प्रशासकीय राजवटीमुळे अधिकाऱ्यांचे फावले!
सिंधुनगरी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा अनेक कारणे पुढे करत नागरिकांना टोलवाटोलवी करत असल्याचे उघड होत आहे. महसूल यंत्रणा, प्रशासक असलेली जिल्हा परिषदेची यंत्रणा सुस्त झाली आहे. शाळा कॉलेज महाविद्यालय सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांची व नागरिकांची प्रशासकीय पातळीवरील अनेक कामे हेलपाटांच्या फेऱ्यात अडकली आहेत. जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने अधिकारी वर्गाकडून नागरिकांना ताटकळत ठेवण्याचे प्रकार समोर येत आहेत. शाळा महाविद्यालयांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा शिक्षण विभाग त्याचे एक बोलके उदाहरण आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालना बाहेर दर दिवशी शिक्षक संस्थाचालकांना ताटकळत ठेवल्याचे बोलके छायाचित्र दर दिवशीच मिळत आहे! त्यामुळे सरकारचे प्रशासनावरील नियंत्रण सुटत असल्याची चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहे!
खरे तर शाळा महाविद्यालय व उच्च शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले असून या सर्व कामासाठी जिल्ह्याचा महसूल विभाग तसेच जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग महत्त्वाचा मानला जातो. तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार कार्यालय व उपविभागीय कार्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी लागणारे अनेक दाखले व त्यावर काम करणारी ऑनलाइन यंत्रणा कोलमडून गेली आहे. माध्यमिक शिक्षण विभाग तर संस्थाचालक शिक्षक मुख्याध्यापक यांना दिवसभर ताटकळत ठेवून वेटिस धरणाचा प्रकारही सुरू झाला आहे.
माध्यमिक शिक्षण विभाग हा शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या नियंत्रणाखाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या थेट नियंत्रणाखाली हा विभाग नसल्यामुळे व जिल्हा परिषदेत लोकनियुक्त प्रशासन नसल्यामुळे या विभागाची मनमानी सुरू झाल्याचे मुख्याध्यापक व संस्थाचालकानी सांगितले आहे. काही अधिकाऱ्यांचा हा मनमानीपणा फटका अनेक नागरिकांना बसत आहे. प्रशासकीय चौकटीतील काम यां ना त्या कारणास्तव अडकवून ठेवून अर्थपूर्ण व्यवहारानंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत काही संस्थाचालक आक्रमक आहेत. दरम्यान या अधिकाऱ्यांची एकीकडे इडी चौकशीही सुरू असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक हेमंत कचरे यांना तीस हजार रुपयाची लाज घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले होते त्याचीही आठवण जिल्ह्यातील या कार्याला समोर ताटकळत राहिलेल्या संतप्त नागरिकांनी करून दिली. तरी त्यात काहिही फरक पडताना दिसत नाही.