अतिवृष्टीचा फटका ; धामापूर मुख्य रस्त्यावर संरक्षक भिंत कोसळून धोकादायक परिस्थिती

सरपंच मानसी परब ,उपसरपंच व सदस्यांनी केली पाहणी

तातडीने डागडुजी करण्याची सा. बांधकाम विभागाकडे केली मागणी 

चौके | प्रतिनिधी :
दोन दिवस होत असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे मंगळवार दिनांक ४ जुलै रोजी रात्रौ मालवण – धामापूर – कुडाळ या मुख्य रस्त्यावरील धामापूर ग्रामपंचायत नजीक २५ ते ३० फुटाची संरक्षक भिंत कोसळून मुख्य रस्त्यालगत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये मुख्य रस्त्याची साईडपट्टी कोसळून डांबरी रस्त्यास भेग पडली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अपघात होऊन धोका निर्माण होऊ शकतो.

दरम्यान धामापूर सरपंच सौ मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर यांनी आज बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे , स्वप्निल नाईक , तलाठी एस के थोरात , सामाजिक कार्यकर्ते प्रा. महेश धामापूरकर , महेश परब , बाबू तोरसकर आदी जण उपस्थित होते. यावेळी सरपंच मानसी परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पी. डी. पाटील यांच्याशी दूरध्वनी वरुन संपर्क साधून संरक्षक भिंत कोसळून निर्माण झालेल्या धोक्याविषयी कल्पना दिली आणि सदर संरक्षक भिंत तातडीने उभारण्याची मागणी केली.