वेंगुर्ला सागरेश्वर मंदिर नजीकच्या धर्मशाळेत चोरी

चोरीतील फरारी दोन्ही आरोपी वेंगुर्ले पोलिसांच्या जाळ्यात

वेंगुर्ले | प्रतिनिधी :
वेंगुर्ला सागरेश्वर मंदिर नजीकच्या धर्मशाळेच्या खोलीच्या कपाटातील लॉकर फोडून त्यातील रोकड २ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८.३० च्या दरम्यान चोरी करण्यात आली. याप्रकरणी वेंगुर्ले- कॅम्प भटवाडी येथील गौरव सुदेश मराठे (३२) व गवळीवाडा येथील दिनेश राजन मिसाळ (३८) या दोन्ही फरारी आरोपीना वेंगुर्ला पोलिसांनी ४ जुलै रोजी रात्री सातारा येथून ताब्यात घेतले आहे.
येथील सागरेश्वर मंदिराच्या धर्मशाळेत चोरी झाल्याचे समजताच मंदिराचे पुजारी वेंगुर्ले परबवाडा येथील रहिवासी विजय विनायक सांडये यांनी याबाबत वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल केली होती. दरम्यान या धर्मशाळेतून चोरी झालेल्या रकमेपैकी आरोपींकडून १७२२ रु रक्कम पोलिसानी जप्त केली आहे. ही चोरी मंदिरात असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. पोलिसांना आपली माहिती मिळाल्याचे आरोपीना समजताच हे दोन्ही आरोपी गुन्हा घडल्यापासून फरारी होते. या दोघांनाही साताऱ्यातून काल रात्री ७.३० वाजता वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज वेंगुर्ला न्यायलायत हजर केले असता ७ जुलै पर्यंत २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजेंद्र भिसे करत आहेत.