साखरीनाटेत कुक्कुट पालन शेड कोसळली
राजापूर | प्रतिनिधी : आठवडाभरापुर्वी सक्रिय झालेल्या पावसाने बुधवारी सकाळपासूनच राजापूर शहर आणि तालुका परिसरात चांगलाच जोर धरला आहे. बुधवारी सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पडलेल्या पावसामुळे साखरीनाटे, तुळसवडे परिसरात घर व झाडांची पडझड झाली आहे. तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी याची तातडीने दखल घेत या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले आहेत.
यावर्षी मान्सून उशीराने दाखल झाला आहे. आठवडा भरापुर्वी सुरू झालेल्या पावसाने आता जोर धरला आहे. मंगळवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला होता. बुधवारी सकाळ पासून पावसाने संततधार धरली आहे. काही भागात वादळी वारा व पाऊस यामुळे ग्रामीण भागात नुकसान झाले आहे. माडबन येथे गंगाराम महादेव गवाणकर यांचे आंबा कलम पडले असून त्यांचे नुकसान झाले आहे. तर ग्रापंचायत साखरी नाटे परिसरात अतिवृष्टी ने दरड कोसळून कोंबडी पालन शेड जमीन दोस्त होऊन कोंबड्यांचे नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील नाटे येथील जाबीर गडकरी यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. मौजे-तुळसवडे येथील श्रीमती शोभा फळसमकर यांच्या गोठ्याचे पावसाने अंशतः नुकसान झाले आहे. तशी माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.
या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी दिले आहे.
संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून नदीकिनारी असणाऱ्या व्यापारी व नागरिकांना सर्तकतेच्या सूचना नगर परिषद व महसूल प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.