झाडाच्या बुंद्याखाली अडकलेल्या महिलेचे आचरा पोलिसांनी वाचवले प्राण

*झाडाच्या बुंद्याखाली अडकलेल्या महिलेचे आचरा पोलिसांनी वाचवले प्राण*
*सिंधुदुर्गनगरी दि.५ (जिमाका)- झाडाच्या मोठ्या बुंद्याखाली पाठीवरती इलेक्ट्रिक मुख्य तारेखाली अडकलेल्या महिलेचे आचरा पोलिसांनी प्राण वाचवले.*
आज सायंकाळच्या सत्रात पीरवाडी आचरा भागातील पूरग्रस्त रस्त्यांची पाहणी करून पेट्रोलिंग करीत असताना भंडारवाडी आचरा येथील मुख्य रस्त्यावर असणारे मारुती मंदिर समोरील मोठे झाड पडून रस्ता बंद असल्याबाबत माहिती मिळाली. ही माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सपोनी अनिल व्हटकर, पोलीस नाईक धेंडे आणि हवालदार पुजारे हे तात्काळ घटनास्थळी गेले. पडलेल्या झाडाची पाहणी करत असताना एका महिलेचा वेदनादायक आवाज ऐकू आला. लगेचच मोठमोठ्या फांद्या बाजूला करून पाहिले असता एक महिला झाडाच्या मोठ्या बुंद्याखाली पाठीवरती इलेक्ट्रिक मुख्य तारेखाली अडकलेली दिसून आली. तात्काळ वीज कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून विजेची मुख्य लाईन बंद करून घेतली. पोलीस ठाण्याकडे आपत्ती व्यवस्थापन साहित्यांमधील कोयता व कुऱ्हाडी मागवून नागरिक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने तात्काळ झाड तोडून महिलेला बाहेर काढले. लगेचच या महिलेला जिल्हा रुग्णालय ओरस येथे उपचाराकरिता दाखल केले. महिलेला तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचे प्राण वाचलेले आहेत.