नववधू प्राजक्ताचा मृत्यूशी संघर्ष
मुंबई : नुकतेच लग्न झालेली नववधू माण (माहेर) व फलटण (सासर) मार्गे ती मुंबईतील विक्रोळी येथील सासरच्या घरी पहिले पाऊल टाकणार होती. नववधूच्या स्वागतासाठी आरतीचे ताट तयार करण्यात आले होते. पण त्या अगोदरच काळाने घाला घातला. (accident)
प्राजक्ता खरात-दडस हिचा मृत्यूसोबत संघर्ष सुरू आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून प्राजक्ता बेशुद्ध अवस्थेत आहे. प्राजक्ताची सासू उज्वला दडस या जागीच ठार झाल्या. पती, सासरे व अन्य एक नातलग गंभीर जखमी झाले. पण प्राजक्ताची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. तिच्या मेंदूला मार लागला आहे. इतर अवयवांनाही इजा झालेली आहे. त्यात मेंदूची दुखापत चिंताजनक आहे.
फलटण येथे बुधवारी (ता. २८ जून) प्राजक्ताचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला होता. पण अवघ्या पाचव्याच दिवशी (ता. ३ जुलै) सासरी येत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.
कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात तिच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तातडीची वैद्यकीय सेवा देवून प्राजक्ताची प्राणज्योत तेवत ठेवली. यानंतर बुधवारी पहाटे ४ वाजता तिला मुलुंड येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राजक्ताला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर खरात आणि दडस कुटुंबिय देवाकडे प्रार्थना करीत आहेत. प्राजक्ता मृत्यूवर मात करून पुन्हा चांगली होईल, असा विश्वास दोन्ही कुटुंबियांना आहे.
फोर्टिस रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. जयेश सरदाना यांनी बुधवारी सायंकाळी तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली आहे. पुढील ४८ तास क्रिटीकल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
फोर्टिस रूग्णालयाची सेवा बरीच खर्चिक आहे. पण प्राजक्ताचा जीव वाचवायचा असेल तर ही महागडी सेवा स्विकारण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच खरात व दडस कुटुंबिय व नातलगांनी मिळून खर्चाचा भार पेलायचे ठरविले आहे. पण फोर्टिसमध्ये पहिल्याच दिवशी साधारण पावणे दोन लाख रूपये उपचार व शस्त्रक्रियेसाठी खर्च झाले आहेत. हा खर्च आणखी वाढत जाणार आहे.
विविध सरकारी योजना, धर्मादाय संस्था व दानशूर व्यक्ती यांच्यामार्फतही संभाव्य वैद्यकीय खर्चाला हातभार लागावा या हेतूने एक Whats app ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये खरात व दडस कुटुंबांतील सदस्य, नातलग, हितचिंतक यांचा समावेश आहे. या शिवाय सरकारमधील वैद्यकीय सेवेशी संबंधित विविध अधिकारी यांनाही या ग्रुपमध्ये सामाविष्ठ करण्यात आले आहे.
प्राजक्ताचे आयुष्य पुर्व पदावर यावे आणि प्राजक्ताला या जीवघेण्या संघर्षातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.