Rain Updates : कोकणात रेड, मुंबईत ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट

जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : मुंबईच्या अनेक भागात बुधवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत भारतीय हवामान विभागाने (IMD) शहरासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह उपनगरातही मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम होत आहे. राज्यात इतर ठिकाणीही कोसळणा-या पावसाचे चित्र पाहता हवामान विभागाने आज कोकणात पावसाचा रेड, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट ?

कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर त्याचबरोबर सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खबरदारी बाळगण्याचे आवाहन

हवामान विभागानं पुढील तीन ते चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदित

कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं बळीराजा आनंदी झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून शेतकरी या पावसाची वाट पाहत होते. पावसामुळं शेतकऱ्यांची काम खोळंबली होती. आता शेती कामांना वेग येणार आहे. अखेर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जातोय.

राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील धुळे, हिंगोली, परभणी, मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर कोकणातील जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. वसमत तालुक्यातील आकोली वसमत रोडवर असलेल्या ओढ्याला या पावसामुळे पूर आला होता. तर पुरात अडकलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना नागरिकांनी मानवी साखळी करत बाहेर काढले.