रिकी पॉटिंगच्या ७१ शतकांचा विक्रम मोडीत
चट्टोग्राम : तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेत २-० ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाचे शनिवारी चट्टोग्रामच्या मैदानामध्ये दमदार पुनरागमन केलं. प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर इशान किशन आणि विराट कोहलीने दमदार फटकेबाजी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. इशानने रेकॉर्डब्रेक द्विशतक तर विराटने ७२ वं शतक झळकावलं. या शतकामुळे सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट केवळ सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. विराटने ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टींगच्या ७१ शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. बांगला देश विरोधात तिसरा एकदिवसीय सामना खेळताना प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली.
पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिखर धवन आठ चेंडूंमध्ये तीन धावा करुन बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने इशान किशनसोबत २९० धावांची भागीदारी केली. यात इशानने १३१ चेंडूंमध्ये २४ चौकार आणि १० षटकांच्या मदतीने तब्बल २१० धावा केल्या. तर इशानला उत्तम साथ देणाऱ्या विराटनेही आपलं ७२ वं शतक साजरं केलं.