नेमळेचे माजी उपसरपंच माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : नेमळे गावचे माजी उपसरपंच माजी सैनिक बाळकृष्ण सोनू राऊळ (६७, रा. फौजदारवाडी ) यांचे बुधवारी निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते तेथेच उपचारादरम्यान त्यांचे प्राणज्योत मालवली.
देश सेवेतून निवृत्त झाल्यानंतर बाळकृष्ण राऊळ १९९२ मध्ये माजी आमदार स्व. जयानंद मठकर यांच्या नेतृत्वाखाली जनता दलातून सावंतवाडी पंचायत समितीचीं निवडणूक लढवून पाच वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला होता. यानंतर २००३ मध्ये तत्कालीन शिवसेनेच्या माध्यमातून नेमळे ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यात पाच वर्षे उपसरपंच पद म्हणून यशस्वी कामगिरी केली.
आपल्या कार्यकालात पदाला योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी केले. लोकांच्या वेळ प्रसंगास धावून जाणे यामूळे ते लोकप्रिय होते. सामाजिक राजकीय कार्यात सतत ते अग्रेसर असत. एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते प्रसिद्ध होते. त्याच्या अशा दुर्दैवी निधनामूळे नेमळे गावातील एक देशसेवक व सामाजिक कार्यकर्ता हरपला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.