राजापूर update : मध्यरात्री लागलेल्या आगीत पवार इलेक्ट्रॉनिक्स आणि ओम ऑनलाईन अँड अकाउंटिंग सर्व्हिसेस सेंटरचे लाखोंचे नुकसान

जळुन खाक झालेले दुकान.

राजापूर | प्रतिनिधी : शहरातील मुख्य रस्त्यालगत राजापूर हायस्कुल नजीक असलेल्या पवार इलेक्ट्रॉनिक्स आणि ओम ऑनलाईन अँड अकाउंटिंग सर्व्हिसेस सेंटरला आकस्मिक लागलेल्या आगीत ही दोन्ही दुकाने जळून खाक झाल आहेत. बुधवारी मध्यरात्री सुमारे 1. 25 ते 1.30 च्या दरम्यान ही आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नसून शॉक सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र दोन उमदया व्यावसायिकांच्या दुकानांना अशा प्रकारे आग लागून त्यांचे होत्याचे नव्हते झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पवार इलेक्टॉनिक्सला लागलेली आग

राजापूर शहरातील जागरूक नागरिक, नगर परिषदेचा अग्नीशमन बंब याने महतप्रयासाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र या आगीत या दोन्ही दुकांनातील सर्व मालाची जळून राख रांगोळी झाली असून दोघांचेही 25 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुसळधार पावसातही आगीचा भकडा उडाल्याने या दोन्ही दुकानांची राखरांगोळी झाली आहे.

महसुल प्रशासनाकडून राजापूर तलाठी संदीप कोकरे यांनी गुरूवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पवार इलेक्ट्रॉनिक्सचे मालक संजय सदाशिव पवार यांचे आतील इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य स्टेशनरी जळून सुमारे 18 लाख 26 हजार रूपये तर ओम ऑनलाईन आणि अकाउंटिंग सर्व्हिसेसचे मालक केदार नारायण साने व केतन नारायण साने यांचे आतील संगणक व सर्व साहित्य जळून सुमारे 6 लाख 14 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आल्याची माहीती कोकरे यांनी दिली. विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संजय पवार यांचे मुख्य रस्त्यावर राजापूर हायस्कुल लगतच पवार इलेक्ट्रॉनिक्स हे विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे दुकान आहे. राजापुरातील इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्री व दुरूस्तीचे एक नावाजलेले दुकान म्हणून पवार यांच्या पवार इलेक्ट्रॉनिक्स दुकानाची ओळख आहे. गेली 22 ते 23 वर्षे ते या राजापूरात व्यवसाय करत आहेत. तर हायस्कुल लगतच हे दुकान असल्याने ते स्टेशनरीही विकतात. तर त्यांच्या दुकानाला लागूनच केदार व केतन साने बंधूंचे ओम ऑनलाईन अँड अकाउंटिंग सर्व्हिसेस सेंटरचे दुकान आहे. साने बंधूनीही अलिकडेच दिड दोन वर्षापुर्वीच आपल्या व्यवसायाला सुरूवात केलेली आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकाराच्या ऑनलाईन सर्व्हीससह संगणकाशी संबधीत साहित्य विक्रीला असते. तर जोड व्यवसाय म्हणून पुजेचे साहित्यही ते विक्री करतात.

बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे पवार व साने देखील आपली दुकाने बंद करून आपापल्या घरी गेले. साने हे दुकानाच्या लगतच रहातात. तर पवार हे महामार्गावर गाडगीळवाडीनजीक रहातात.

जाळून खाक झालेले दुकान

मध्यरात्री 1.17 वाजता त्यांना साने यांचा दुकान व परिसरात आग लागल्याचा फोन आला असता तातडीने सौरभ हा आपल्या वडीलांसह दुकानाच्या ठिकाणी दाखल झाला. मात्र तोपर्यंत आग भडकली होती व दुकान पुर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दुकानात वहया पुस्तकांसह टीव्ही, फ्रीज, अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंनी पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला होता. तर साने यांच्या दुकानानेही पेट घेतल्याने त्यांचेही साहित्य जळून खाक झाले होते.

या घटनेची माहीती पवार व साने यांनी राजापूर पोलीस व नगर परिषदेला देताच तात्काळ नगर परिषदेचा अग्नीशमन बंब दाखल झाला. तत्पुर्वीच कोठारकर बंधूनी आपले पाण्याचे टँकर आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस निरीक्षक भरत धुमाळ हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. तर आग लागल्याचे समजाच राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमिर खलिफे, न. प. चे अविनाश नाईक, संजीव जाधव व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशामक चालक रूपेश कणेरी यांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. राजापूरचे डॉ. सागर पाटील यांसह अनेकांनी पवार व व साने यांच्या दुकानांना आग लागल्याचे कळताच घटनास्थळी दाखल झाले. भर पावसात आगीचा भडका उडाला होता, मात्र तरीही अनेकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. अखेर महतप्रयासाने आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या दोन्ही दुकानांतील माल व दुकाने पुर्णपणे जळून खाक झाली होती.

पवार इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातुन गेली 20 ते 22 वर्षे संजय पवार हे आपला व्यवसाय करत आहेत. त्यांच्या दुकानात विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीसाठी होते. तर अनेक ग्राहकांच्या टीव्ही व अन्य इलेक्ट्रॉनिक्स साहित्य दुरूस्तीसाठी आलेले होते. तर शालेय साहित्य वहया, पुस्तके फ्रीज यांसारख्या सर्व वस्तु जळून खाक झाल्या आहेत. रात्री 1. 25 वाजता दुकानाजवळ दाखल झालेल्या पवार यांनी दुकान वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न् केले. मात्र आग इतकी भडकली होती की पुढे जाणेही शक्य नव्हते. मात्र आपण उभं केलेलं साम्राज्य डोळयासमोरच जळताना पवार यांना पहावे लागले. गुरूवारी दिवसभर अनेकांनी पवार व साने यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

तर प्रशासनाकडून पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळु शकलेले नसून शॉकसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.