दूर्घटनेत ५५ वर्षीय इसम बालबाल बचावला
भटपावणीतील ग्रामस्थांचा सातार्डा बाजारपेठेशी तुटला संपर्क
सातार्डा । प्रतिनिधी :मुसळधार पावसामुळे सातार्डा भटपावणी येथील लोखंडी पुलावर आकाशीचे झाड कोसळल्याने लोखंडी पूल मोडला. पूल मोडल्याने भटपावणीतील ग्रामस्थांचा सातार्डा बाजारपेठेतील संपर्क सुटला आहे. या दुर्घटनेतून विलास गोवेकर ( ५५ ) हे बालंबाल बचावले आहेत.
गुरुवारी सकाळपासून परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरु असताना सकाळी सहा वाजताच्या दरम्यान लोखंडी पुलाच्या बाजूला असलेले आकाशीचे झाड पुलावर कोसळल्याने नुकसान झाले.
सकाळी सहा वाजताच्या दरम्यान मुलांना एस टी बससाठी सोडायला जाणाऱ्या विलास गोवेकर यांच्यावर आकाशीचे झाड पडले असते. सुदैवाने श्री गोवेकर या दुर्घटनेतून बचावले. झाड कोसळल्याने वीज पुरवठा तारा तुटल्या होत्या.चाळीस वर्षांपूर्वी लोखंडी पुल बांधण्यात आला होता. पूल दुरुस्थिची मागणी ग्रामस्थांनी अनेकवेळा केली होती. ग्रामपंचायतने पूल दुरुस्थी केली नाही व पुलाची देखभाल केली नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
लोखंडी पुलावर कोसळलेले झाड बाजूला करण्यासाठी निखिल गोवेकर, सर्वेश मांजरेकर, अमित नागवेकर, संदेश गोवेकर व भटपावणीवाडीतील ग्रामस्थांनी मदत केली. सरपंच संदीप प्रभू , तलाठी व ग्रामपंचायत सदस्यांनी कोसळलेल्या लोखंडी पुलाची पाहणी केली.