हळदीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प तांत्रिक मार्गदर्शनाने यशस्वी होणार!-प्रशांत राऊत

गुहागर (प्रतिनिधी): गुहागर तालुक्यासह संगमेश्वर,चिपळूण ,खेड या चारही तालुक्यात
जि.प.रत्नागिरी च्या कृषी विभागाच्या वतीने सुरू केलेला हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमतर्गतचा हा प्रात्यक्षिकाचा प्रकल्प SK-4 या हळदीच्या वाणाचे प्रणेते सचिन कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी अधिकारी ,विस्तार अधिकारी यांच्या तांत्रिक सहकार्याने यशस्वी होणार,असा आशावाद गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी व्यक्त केला. ते पंचायत समिती गुहागरच्या SK-4 हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत तळवली येथील शेतकरी संतोष आग्रे यांच्या शेतावर प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण या उपक्रमाच्या वेळी उपस्थित होते.यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार साहेब यांच्या संकल्पनेतून व सुचनेनुसार हा 4 तालुक्यासाठीचा प्रकल्पातील सहभागी शेतक-यांच्या शेतावरचा 10 गुंठ्याचा डेमो प्रात्यक्षिकाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्पेशल कोकण -4 या नवीन संशोधित केलेल्या हळदीच्या वाणाचे प्रात्यक्षिक व प्रयोग जसे डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे सुरू आहेत तसेच प्रयोग शेतक-यांच्या शेतावर यापूर्वी गेल्या दोन वर्षात जि.प.रत्नागिरीच्या कृषी विभागाच्या अनुदानातून मंडणगडसह गुहागर पंचायत समितीच्या वतीने दोन्ही तालुक्यात यशस्वीरित्या केल्या गेले. यावर्षीही विद्यापीठासह चार तालुक्यातील मोजक्याच शेतक-यांच्या शेतावर हे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहेत.या प्रकल्पातील यशापयशावरच जिल्ह्यात हळद लागवड मोठ्याप्रमाणात करायची कि नाही,हे अवलंबून राहणार आहे. डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शात्रज्ञ डाॅ.प्रफुल्ल माळी व SK-4 चे प्रणेते सचिन कारेकर हेसुद्धा वेळोवेळी ह्या लागवडीला भेट देवून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर साहेब,सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकरसाहेब , SK-4 चे प्रणेते सचिन कारेकर, कृषी अधिकारी आर.के.धायगुडे,कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर,शेतकरी संतोष आग्रे,अॅड.संदीप आग्रे, कृषी पर्यवेक्षक श्री.कुलकर्णी,ग्रामविकास अधिकारी एस.आर.बागूल,कृषी सहाय्यक अमित शेळके,दिपक शेवडे, लिपिक प्रदीप चव्हाण, SK-4 हळद रोपवाटीकेचे वसंत मुकनाक, यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.