मंडणगड – खेड बसफेरीत अनियमितता – कर्मचारी, नागरीकांचे आगारव्यवस्थापणाच्या कारभाराबाबत नाराजी- 

मंडणगड l प्रतिनिधी :  मंडणगड – खेड ही सायंकाळी ६ वा. मंडणगड आगारातून खेड कडे जाणारी बस नियमित उशिरा मार्गस्थ होत असल्याने या मार्गावर जाणारे विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक यांच्याकडून मंडणगड आगाराच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत मंडणगड मधील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राजेश नगरकर यांनी आगारप्रमुख श्री. फडतरे यांच्याकडे तक्रार केली असून मंडणगड –खेड या बससेवेसह सर्वच ठिकाणांकडे बसफेऱ्या नियोजित वेळेत मार्गस्थ करण्याची मागणी केली आहे, तसे न झाल्यास त्यांनी एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे .

श्री. नगरकर यावेळी म्हणाले कि, मागील अनेक वर्ष सायंकाळी ६ वा. सुरळीत सुरू असलेली मंडणगड – खेड एस. टी. बस सेवा ही मंडणगडवासीय व तालुक्याच्यादृष्टिने अतिशय सोयीची बस सेवा आहे. सायंकाळी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुटल्यानंतर कर्मचारी वर्गाला व शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मंडणगड ते खेड या मार्गावर जाण्यासाठी सायंकाळी ६ वा. सुटणारी मंडणगड – खेड बसफेरी सर्वाना सोयीची ठरणारी आहे. मात्र मागील एक ते दीड वर्षांपासून या बसफेरीमध्ये अनियमित्तता आहे. सहा वाजता सुटणारी ही बस तास ते दीड तास उशिरा सुटते त्यामुळे सगळ्यांचीच गैरसोय होते, तासनतास बसची वाट पहावी लागते. त्यामुळे याबाबत प्रवाश्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गाडीबद्दल प्रवाशांच्या मनात बेभरवसा निर्माण झाला आहे. साहजिकच प्रवाशी गाडीकडे पाठ फिरवतात व अन्य पर्यायांचा विचार करतात. गाडीचे भारमान कमी होण्यास ते अनेकापैकी एक कारण होऊ शकते. हे जे बस उशिरा पाठवणे प्रकरण आहे ते कुठेतरी थांबवणे आवश्यक आहे. नियमित गाडी चालू असेल तर एक विश्वासाचे वातावरण निर्माण होईल आणि कायमचा प्रवाशी बांधला जाईल असे राजेश नगरकर यांनी यावेळी म्हटले आहे. शिवाय मंडणगड ते खेड या बसफेरीसह तालुक्यातील अन्य ठिकाणी जाणाऱ्या बससेवा नियोजित वेळेत सुरळीत न झाल्यास एसटी प्रशासना विरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.