कणकवली : शहरात मागील अनेक दिवसांपासून चोऱ्यांचा सत्र सुरू आहे. अशातच चोरटे बंद असलेलेच फ्लॅट फोडत असल्याचे समोर येते. कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील काही दिवसांसाठी बंद असलेले दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. ही घटना रविवारी रात्री १ वा. च्या सुमारास उघडकीस आली.
Thieves broke two flats in Kankavli; Incident at Dattakripa Apartment in Bandhkarwadi
फोडलेल्या फ्लॅटमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश लक्ष्मण पवार (६५) यांच्या फ्लॅटचा समावेश आहे. त्यांच्या फ्लॅटमधून ५ लाख २० हजार रुपये रोकड व चांदीची दोन हजार रुपयांची समई चोरीस गेली तर अन्य फ्लॅटचे मालक हरीश पुरोहीत हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या फ्लॅटमधील चोरीस गेलेला मुद्देमाल समजू शकला नव्हता. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, हवालदार आर. बी. नानचे यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले तर सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, कॉन्स्टेबल सचिन माने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
तत्पूर्वी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा मागमूस लागू शकला नव्हता. मागील काही दिवस शांत असलेले चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने कणकवलीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.