प्रगतशील शेतकरी बाबल नाईक यांचे निधन

दोडामार्ग | प्रतिनिधी : दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर वसाहत येथील बाबुराव पाटयेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रगतशिल बागायतदार बाबल गणपत नाईक उर्फ (झिला पाटयेकर) वय ८९यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. दोडामार्ग तालुक्यात झिला पाटयेकर म्हणून ते परिचित होते. त्यानी गावचे पोलीस पाटीलही पद भूषविले होते. प्रगतशील बागायतदार असलेले झिला पाटयेकर दोडामार्ग तालुका आत्मा संस्थेचे अध्यक्षही होते. माध्यमिक शिक्षणा अभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी कै बाबुराव पाटयेकर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. त्यानंतर या संस्थेची कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय या नावाने दाणोली येथे शाळा सुरू करण्यात आली. त्यामुळे दाणोली परिसरातील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची गैरसोय दूर झाली. कै बाबुराव पायेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार शरद पाटयेकर तसेच प्रगतशील बागायतदार शैलेंद्र व शशिकांत पाटयेकर यांचे ते वडील होत तर दाणोली हायस्कूलचे मुख्याध्यापक जयवंत पाटील तसेच पेडणे कॉलेजचे निवृत्त प्रा विवेक पेडणेकर यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत पाटयेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.