महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयात डब्ल्यू – २० अंतर्गत बचत गट महिलांसाठी चर्चासत्र, कार्यशाळा

रत्नागिरी : भारताकडे असलेल्या जी- २० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशभरात विविध प्रकारच्या बैठका, प्रशिक्षणे, चर्चासत्रे, कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या अनुषंगाने रत्नागिरीत शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डब्ल्यू- २० अंतर्गत महिलांसाठी प्रशिक्षण, चर्चासत्र होणार आहे. येत्या १५ जुलैला कर्वे संस्थेच्या शिरगाव येथील कडवाडकर संकुलात हा कार्यक्रम होणार आहे.

भारत सरकारने एसएनडीटी महिला विद्यापीठाला शैक्षणिक भागीदार म्हणून डब्ल्यू- २० चे आयोजन करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने एसएनडीटी विद्यापीठाने काही निवडक महाविद्यालयांची निवड डब्ल्यू- २० आयोजनासाठी केली आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शिरगांव येथील एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन फॉर वुमेनला डब्ल्यू- २० च्या आयोजनाची संधी मिळाली आहे.

वुमन लिड डेव्हलपमेंट याअंतर्गत ग्रासरूट वुमन लिडरशीप या विषयाची निवड केली आहे. यात बीसीए कॉलेजने रत्नागिरीतील विविध बचत गटांच्या समस्या व सूचना एसएनडीटी विद्यापीठापर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आहे. यामध्ये तालुक्यातील बचत गटाच्या सर्व १० क्लस्टर को- ऑर्डिनेटर्स यांचे तळागाळातील महिलांचे नेतृत्व या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. याचबरोबर डिजीटल मार्केटिंग या संदर्भात कार्यशाळा व या १० क्लस्टर्सचे बचतगट स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी असणार आहेत. डब्ल्यू २० परिषद १५ जुलैला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कडवाडकर संकुल येथे चर्चासत्र होणार आहे.

जी – २० विषयी थोडेसे..
जी ट्वेंटी म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे. 1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना झाली. दि. १ डिसेबर २२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जी- २० चे अध्यक्षपद भारताकडे आहे. भारताच्या जी- २० अध्यक्षपदाची संकल्पना “वसुधैव कुटुंबकम् किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी आहे. या अनुषंगाने देशभरात विविध प्रकारच्या बैठका, कार्यक्रम, प्रशिक्षणे, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकीच एक डब्ल्यू २० बैठक.

भारतरत्न महर्षी कर्वे यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णासाहेब कर्वे) यांनी स्त्री शिक्षणासाठी १८९६ मध्ये पुणे येथे शिक्षण संस्थेची स्थापना केली. महिलांच्या उन्नतीसाठी व विकासासाठी, महिलांना शिक्षणातून स्वावलंबी बनवण्यासाठी कार्य करणारी एकमेव संस्था म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा नावलौकीक आहे. शिक्षणामुळे स्त्री स्वतंत्र व कर्तव्यदक्ष बनेल व अशा आकांक्षांचे अमर्याद क्षेत्र स्त्रीयांना शिक्षणामुळे मोकळे होईल व ती अधिक सामर्थ्यवान बनेल’, हा केवळ आशावाद नव्हता की आशिर्वाद नव्हता तर तो ध्यास होता, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा.

या संस्थेचे कार्य ५० पेक्षा अधिक शाखांमध्ये अविरतपणे चालू आहे. ही संस्था अनेक निराधार, वृध्द स्त्रिया, अनाथ मुली यांचे आश्रयस्थान असून तेथे त्यांना शिक्षण व रोजगार उपलब्ध केला जातो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे १९९९-२००० पासून शिरगांव, रत्नागिरी येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन फॉर वुमेन अत्यंत प्रभावी व कार्यक्षमपणे कार्यरत असून एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्नीत आहे.

भारतात २०० बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जी- २० अध्यक्षतेच्या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन, भारत ३२ वेगवेगळया शहरांमधील ५० हून अधिक शहरामध्ये २०० हून अधिक बैठकांचे आयोजन करत आहे. भारताचे जी- २० प्राधान्यांपैकी एक आहे ते म्हणजे महिलांच्या नेतृत्वाखालील विकास. जी- २० अंतर्गत बी- २०, सी- २०, एल- २०, एस- २०, साई- २० स्टार्टअप २०, टेक-२०, थिंक- २०, यू- २०, डब्ल्यू- २०, वाय- २० या बैठका घेणार आहेत.