कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी केले संकल्प
रत्नागिरी : कोरोना काळानंतर खूप पैसा असलेला माणूस श्रीमंत नव्हे तर ज्याचे आरोग्य चांगले तो श्रीमंत. त्यामुळे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी छोटे छोटे संकल्प करून ते पूर्ण करण्याची कल्पनाच सुरेख आहे. गेली तीस वर्षे शाळेत हा उपक्रम सुरू असल्याबद्दल आनंद वाटतो, विद्यार्थ्यांनी हे संकल्प पूर्ण करावेत. चांगला माणूस बनणे आवश्यक आहे. असे आवाहन डाएटच्या अधिव्याख्यात्या प्रा. दीपा सावंत यांनी केले.
कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांचा संकल्प दिन साजरा झाला. त्या वेळी आचार्या म्हणून दीपा सावंत बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, माझी मुलेसुद्धा या शाळेत शिकली आहेत. मी अभिमानाने या शाळेची गुणवत्ता व होणारे संस्कार याबद्दल सांगू शकते. आपली मुले प्रमाणभाषेच्या पातळीवर बोलतात. मराठी माध्यमातून मुले खूप चांगल्या प्रकारे शिकत आहेत. या संकल्पांचे महत्त्व तुम्हाला आता कळणार नाही. पण हे संकल्प सिद्धीस न्यायचे आहेत. त्यातून चांगला माणूस म्हणून समाजात वावरायचे. सर्वांगिण विकास हवा. परीक्षेतले ९८ टक्के गुण कोणी विचारत नाही. पण तुम्ही समाजासाठी काय करता, छोट्या गोष्टीत मदत कशी करता, यातून तुमचे व्यक्तीमत्व घडत असते.
या वेळी विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठणे, देवाला, वडिलधाऱ्यांना नमस्कार करणे, सूर्यमंत्राचे पठण, समंत्र सूर्यनमस्कार, शालेय अभ्यास, चांगला आहार, पानात वाढलेले सर्व पदार्थ आवडीने खाईन, चांगले तेच बोलेन, समाजातील दीन-दुबळे, दिव्यांगांना मदत करीन, वृक्षवेलींचे संवर्धन करीन आदी संकल्प केले. सुरवातीला विद्यार्थिनींनी आचार्य दीपा सावंत यांचे पूजन केले. संकल्प गीत सादर केले. संकल्पाचे उच्चारण सौ. पेठे यांनी विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. त्यानंतर दीपा सावंत यांनी सूर्यमंत्र व समूहमंत्राचे उच्चारण करून स्पष्टीकरण केले. कार्यक्रमात भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी सौ. सावंत यांचा सन्मान केला.
याप्रसंगी शाळा प्रबंधक प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, शाळा समिती सदस्य राजेंद्र कदम, सतीश दळी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पालकांनी मुलांसोबत कसे वागावे, कोणत्या चांगल्या सवयी लावाव्यात, याबाबत दीपा सावंत यांनी पालकांशी संवाद साधला. सौ. ज्योत्स्ना सागवेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सौ. मंजिरी गुणे यांनी सूत्रसंचालन केले.