सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळे येथे दुचाकी स्वाराला धडक देऊन गोव्याच्या दिशेने पलायन केलेल्या ट्रक चालकाला सावंतवाडी पोलिसांनी कर्नाटकात जाऊन ताब्यात घेतले. सलीम अब्दुल अमिर शेख (३८, रा. चित्तासपूर, जि. कुलबर्गी, कर्नाटक) असे त्याचे नाव असून त्याची चौकशी सुरु आहे.
या अपघातात दुचाकीस्वार रवि तावरू लमाणी (३३) याचा मृत्यू झाला होता तर त्याची पत्नी शिलाबाई लमाणी ही जखमी झाली होती. या अपघातानंतर अज्ञाताविरोधात सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तपासादरम्यान संबंधित ट्रक हा कर्नाटकातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांनी पोलीस पथकासह कर्नाटक येथे जात त्याला ताब्यात घेतला. या अपघातातील ट्रक देखील ताब्यात घेण्यात आला. या कारवाईत हेड कॉन्स्टेबल प्रवीण वालावलकर, धनंजय नाईक, कॉन्स्टेबल वेंगुर्लेकर सहभागी झाले होते.