अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे अधिक श्रावण कीर्तन सप्ताह

 

कीर्तन सप्ताहाचे तपपूर्ती वर्ष; युवा, ज्येष्ठ कीर्तनकारांचा सहभाग

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे यंदाचे हे तपपूर्ती वर्ष आहे. मंगळवार १८ जुलै ते सोमवार २४ जुलैपर्यंत सात दिवस दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळात मंडळाच्या जोशी पाळंद, वरची आळी, रत्नागिरी येथील भगवान परशुराम सभागृहात हा सप्ताह युवा व ज्येष्ठ कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेने रंगणार आहे.

मंगळवार १८ जुलैला ह.भ.प. सौ. तेजस्विनी कुलकर्णी (पुणे) या नरव्याघ्र तानाजी मालुसरे यावर कीर्तन करणार आहेत. या पुण्यामध्ये आयटी कंपनीत नोकरी करत असून ७ वर्षांपासून कीर्तने करत आहेत. किर्तन चंद्रिका (मुख्य) ही पदवी करवीर पीठ शंकराचार्यांकडून प्राप्त आहे. तसेच अनेक सन्मान चिन्ह मिळालेली आहेत. महाराष्ट्र व राज्याबाहेर कीर्तन सेवा, श्रीरामकथा, प्रवचन सेवा सादर केलेल्या आहेत.

बुधवार १९ जुलै रोजी ह.भ.प. विजय मांदुस्कर (रानपाट, लाजूळ) हे दुर्वास ऋषींचे आमरस भोजन यावर कीर्तन सादर करतील. १९७८ सालापासून ते कीर्तने करत असून आतापर्यंत सुमारे दीड हजार कीर्तने बुवांनी केली आहेत. अखिल भारतीय कीर्तन कुल रत्नागिरी शाखेतर्फे ते सन्मानित आहेत.

गुरुवार २० जुलै रोजी ह.भ.प. मृणाल गांवकर (मालवण) संत जनाबाई आख्यान विषयावर कीर्तन करेल. तिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय गायनाची मध्यमा प्रथम परीक्षा दिली आहे. अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर, सिंधुदुर्ग शाखेत ह.भ.प.श्रीरामबुवा झारापकर यांच्याकडे विशारदपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

शुक्रवार २१ जुलैला युवा कीर्तनकार ह.भ.प. मोहक रायकर (डोंबिवली) हे एकनाथ शिष्य- गावबा चरित्रावर कीर्तन करतील. ते कीर्तन विशारद असून 10 वर्षे नारदीय कीर्तनकार म्हणून कार्यरत आहेत. कीर्तन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शनिवार २२ जुलैला ह.भ.प. श्रीकांत बापट (मुर्डी, आंजर्ले, ता. दापोली) हे मिनलदेवी कथा आख्यानावर कीर्तन करतील. ह.भ.प. महेश बुवा काणे यांच्याकडे त्यांचे कीर्तन अलंकारपर्यंतचे शिक्षण झाले आहे.

रविवार २३ जुलैला ह.भ.प. ज्योत्स्ना गाडगीळ (अंबरनाथ-मुंबई) या रोहिडेश्वराची शपथ यावर कीर्तन करतील. त्या संगीत विशारद, गांधर्व विद्यालय नाट्यसंगीत पदविका प्राप्त आहेत. वयाच्या दहाव्या वर्षांपासून कीर्तनाला सुरवात केली. आजवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर ५०० हून अधिक कीर्तन प्रयोग सादर केले आहेत. मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक, वार्ताहर, सध्या लोकमतच्या संकेतस्थळावर भक्ती विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

सोमवार २४ जुलैला युवती कीर्तनकार ह. भ.प. तेजस्विनी जोशी (रत्नागिरी) सुभद्रा आभास यावर कीर्तन करतील. सध्या ती एफवायबीए वर्गात शिक्षण आहे. घराण्यातील कीर्तन परंपरा जोपासण्यासाठी तिने आजोबा ह.भ.प. श्री. नाना जोशी, काका ह.भ. प. किरण जोशी यांच्याकडून कीर्तनाचे शिक्षण घेतले आहे. तिने १०० कीर्तने केली आहेत.

कीर्तन सप्ताहात ऑर्गनची साथसंगत निरंजन गोडबोले, आनंद पाटणकर, श्रीरंग जोगळेकर, श्रीधर पाटणकर, मंगेश मोरे, चैतन्य पटवर्धन व विजय रानडे करणार आहेत. तबला साथसंगत पुष्कर सरपोतदार, प्रथमेश शहाणे, देवाशीष बापट, निखिल रानडे, प्रथमेश फाटक, सुयश जोशी व स्वरूप नेने करणार आहेत.

कीर्तन सप्ताहाचा आस्वाद सर्व कीर्तनप्रेमी श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन चित्पावन मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्यांनी केले आहे. ज्यांना या कीर्तन सप्ताहासाठी एखादे कीर्तन प्रायोजित करण्याची इच्छा असेल त्यांनी मंडळाच्या जोशी पाळंद, रत्नागिरी येथील कार्यालयात संपर्क साधावा अथवा ९३२५१००१५१ या कार्यालयाच्या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.