रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाबाबत मनसेचा आंदोलनाचा ईशारा

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतनीकरणाबाबत रत्नागिरी मनसे आक्रमक झाली असून सोमवारी याबाबत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले. तसेच या निवेदनाची प्रत जिल्हा पोलिस अधिक्षक व विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी यांना ही सादर करण्यात आली.

या निवेदनात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम हे मातीचे मोठे ढिगारे , खड्डे व उभारलेले काही खांब यापलीकडे गेलेले दिसत नाही. तसेच शासन दरबारी अनेक बैठका पार पडून ही बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाचा जनतेला सोसावा लागणारा मनस्ताप, यात बस पकडण्यासाठी बसस्थानकासमोरील रस्त्यावर महिला, मुले, आबालवृद्धांना भर पावसात, उन्हात उभे रहावे लागणे, सकाळ च्या सत्रात वाहनांची प्रचंड वर्दळ व बस पकडणाऱ्या प्रवाशांची लगबग व गर्दी यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी व त्यामुळे दुर्दैवी अपघाताची शक्यता हे मुद्दे मांडण्यात आले आहेत व या मुद्द्यांचा विचार करता पुढील १० दिवसात तात्काळ हे काम सुरू न झाल्यास रत्नागिरीकरांच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आक्रमक व तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला.

मनसे पदाधिकाऱ्यांनी सदर बांधकामाच्या ठिकाणी जात पाहणी केली असता तेथे मोजकेच कामगार व बांधकाम साहित्यही निकृष्ट दर्जाचे आढळून आले, यावेळी मनसे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर , शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी , मनसे परिवहन सेना राज्य उपाध्यक्ष सुनिल साळवी , शहरसचिव अजिंक्य केसरकर , उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण , विभागअध्यक्ष सर्वेश जाधव , मनसे रस्ते साधन-सुविधा व आस्थापना तालुका संघटक सतिश खामकर , उपतालुका संघटक प्रशांत कुडाळकर , शहर संघटक सुशांत घडशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.