वेंगुर्ले : प्रतिनिधी
आरटीओ असल्याचे सांगत गाडी थांबवून चार व्यक्तींनी आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार उभादांडा येथील एका २७ वर्षीय युवतीने वेंगुर्ला पोलिसात दिली आहे. दरम्यान तिने दिलेल्या तक्रारी नुसार ओरोस येथील प्रीतम पवार यांच्यासाहित चार व्यक्ती व युवतीच्या भावोजीना “हे प्रकरण वाढविलात तर तुमच्या अंगलट येईल” असे सांगून धमकी दिल्या प्रकरणी शिरोडा येथील आर टी ओ एजंट प्रकाश गावडे यांच्यावर वेंगुर्ले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या युवतीने वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, काल सोमवार दिनांक १० जुलै २०२३ रोजी दुपारी १.३० च्या दरम्याने मी माझा भाचा कु. समर्थ याला शाळेतून आणण्याकरिता उभादांडा ते वेंगुर्ला अशी माझ्या ताब्यातील माझे भावोजी आदित्य हळदणकर यांच्या नावे असलेली फसिनो दुचाकी घेऊन जात असताना पांढ-या रंगाच्या चार चाकी सुमो गाडीने मानसिश्वर देवस्थानच्या पुढे येवून माझ्या गाडीला ओव्हरटेक करून माझी गाडी थांबविली. त्या गाडीमध्ये चार माणसे होती. त्यातील दोन माणसे खाली उतरली त्यातील एका माणसाने माझ्याकडे लायसनची मागणी केली. म्हणून मी त्यांना माझे लायसन दाखविले त्यानंतर त्यांनी माझ्याकडे माझ्या ताब्यातील गाडीचे कागदपत्र मागितले. म्हणून मी कागदपत्रेही दाखविली. सदरची कागदपत्रे पाहून त्या माणसाने मला आदित्य हळदणकर कोण काय असे विचारले ? त्यावर मी त्यांना ते माझे जीजू आहेत असे सांगितले. मी असे सांगितल्यावर तेथे असलेली ती चारही माणसे एकमेकांकडे पाहून इशारे करुन आपसात चर्चा करुन हसू लागले. मला त्या गोष्टीचा राग आल्याने मी त्यांना माझ्या भाच्याची शाळा सुटली असणार मला जायचे आहे असे सांगितल्यावर त्यांनी माझेकडे विचित्र नजरेने पाहुन “तुला खुपच घाई आहे, तु नक्की शाळेतच जातेस की आणखी कुठे, तुला उशिर होत असेल तर आम्ही तुला शाळेत सोडायला येतो “असे सांगितल्याने माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे हेल्मेट नाही व पी.यु.सी नसल्याने १५०० रुपये तुम्हाला भरावे लागतील असे सांगितले. त्यावर मी त्यांना माझ्याकडे पैसे नसून माझ्या घरातल्यांशी बोलावे लागेल असे सांगितले असता तुम्ही गाडीच्या मालकासोबत बोलून ऑनलाईन दंड भरा असे सांगितले. त्यावेळी त्यांनी माझ्या घडयाळ्याकडे पाहून मँडम “आता शाळा सुटलीच असेल, तुम्हाला लेट झाला, तु नक्की जातेस कुठे, नक्की शाळेतच जातेस ना, आम्ही तुझ्या मागून बघायला येणार असे सांगुन माझ्याकडे विचित्र नजरेने बघून हसून माझी मस्करी करून लागले त्या मुदतीत त्यांनी मला दंड केल्याचा मोबाईलवर मेसेज आला म्हणून मी त्यांचेकडे माझ्या लायसनची मागणी केली असता ते मुद्दाम लायसन हातात घेवून बराच वेळ कोणतेही कारण नसताना माझ्याकडे दिले नाही. मला दंड केल्याची पावती त्यांनी मला दिली असता त्यावर पाहीले असता मला प्रितम पवार असे नाव असून त्यांची सही आहे. त्यानंतर मी शाळेत जायला गेले.
ही घटना मी माझ्या घरी व भाओजी आदित्य हळदणकर यांना सांगितली. दरम्यान त्या मुदतीत माझे भावोजी आदित्य हळदणकर यांना शिरोडा येथील राहणारे आर. टी. ओ. एजेंट प्रकाश गावडे यांनी फोन करुन “सदरचे प्रकरण वाढवू नका हे प्रकरण वाढविलात तर तुमच्या अंगलट येवू शकते, तुमच्यावरच ३५३ दाखल करु अशी धमकी दिली असून त्यामुळे आपण ओरोस येथील प्रीतम पवार सहित अन्य ३ अनोळखी व्यक्ती व प्रकाश गावडे यांच्या विरुद्ध कायदेशिर तक्रार करत असल्याचे म्हटले आहे. यानुसार या पाचही जणांवर भादवी कलम ३५४(A)(iv), ५०६, ३४ नुसार वेंगुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.