माजगांवचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा : डॉ. अर्चना सावंत

Google search engine
Google search engine

भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास

मुलभूत विकासाबरोबरच महिलांच्या रोजगारासाठी करणार प्रयत्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :

माजगांव येथे घरोघरी प्रचारासाठी फिरत असताना मतदारांचा वाढता पाठींबा मिळत आहे. विशेषतः महिला आपल्या समस्या मांडत असून त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे.

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने व समाजकार्याची आवड असल्याने माझे शिक्षण व अनुभवाचा फायदा गावच्या विकासासाठी होण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा शब्द जनतेला दिला असून आमच्या युतीच्या नेत्यांची खंबीर साथही आम्हाला आहे, त्यामूळे माजगांवात आमचा विजय निश्चित असल्याचा दावा भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार

डॉ. अर्चना सावंत यांनी केला. माजगाव येथे प्रभाग क्रमांक ४ मध्ये प्रचारादरम्यान त्यांच्याशी संवाद साधला असता डॉ. अर्चना सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

माजगांव हा सावंतवाडी शहरालगत असलेला गाव असून या गावाचे अलिकडे वेगात शहरीकरण होत आहे. नवीन घरे इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना त्या पद्धतीने भौतिक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. आजही माजगांवच्या रस्तावाडा व अन्य काही भागात पाण्याची समस्या आहे. रस्ते, पाणी आरोग्य सुविधा या बाबींबरोबरच बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून विशेषतः महिलांच्या दोन हातांना काम देण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी जरी वैद्यकीय क्षेत्रात असले तरीही या गावाशी माझी नाळ जोडलेली आहे. माझे पती अजय सावंत हे गेली अनेक वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे मलाही जनतेच्या प्रश्नांची जाण आहे. सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर जनतेच्या या समस्या सोडविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

विशेष म्हणजे केंद्रात व राज्यात आमच्या युतीचीच सत्ता असल्याने त्याचा फायदा आम्हाला गावच्या विकासासाठी होईल. सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. तरी माजगांवच्या ग्रामस्थ, युवक व महिला मतदारांनी विकासासाठी मला व माझ्या पॅनल मधील सर्व सहकाऱ्यांना मतदान करून साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Sindhudurg