इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर : एक वर्षाच्या काळात आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आणि या दोन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांसह बहुसंख्य आमदार आणि खासदार हे भाजपसोबत आले. अगोदर एकनाथ शिंदे आणि आता अजितदादा पवार यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वाविरोधात रणशिंग फुंकले आणि दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना रस्त्यावर यावे लागले. आपलाच पक्ष ओरिजिनल आहे, असा दावा करीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांवर धावाधाव करण्याची पाळी आली आहे.
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होती आणि त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होती. शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार विजयी झाले. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला आणि शिवसेनेचे ४० आमदार (आणखी १० अपक्ष आमदार) भाजपसोबत गेले. जून-जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंतोषाच्या स्फोट झाला आणि पक्षाचे ४० आमदार भाजपसोबत गेले. या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षात १६, तर शरद पवारांच्या पक्षात १४ आमदार उरले आहेत. दोन तृतियांश आमदार बाहेर पडले, तर त्या फुटीला कायद्यानुसार मान्यता मिळते. त्यासाठी शिवसेनेतील बंडखोर आमदारांची संख्या ३९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर आमदारांची संख्या ३६ असणे आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडललो नाही, तर आम्ही शिवसेना म्हणूनच भाजपसोबत सरकारमध्ये सामील झालो आहोत, अशी भूमिका मांडली आहेच. तसेच अजित पवारांनीही आम्ही काही राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेलो नाही, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही भाजप सरकारसोबत राज्यात सामील झालो आहोत, हे स्पष्ट केले आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांची गट नेते म्हणून निवड केली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजित पवार यांना निवडले आहे. दादा गटाने जयंत पाटील यांना हटवून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तसेच अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्याचेही घोषित केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळवून फार मोठी लढाई जिंकली आहे. पक्षाचे विधिमंडळ व संसदेतील संख्याबळ दोन तृतियांशपेक्षा जास्त शिंदे गटाकडे आहे. शिवसेना हे नाव जरी आपल्याकडे ठेवण्यात शिंदे गट यशस्वी ठरला असला तरी पक्षाचे मुख्यालय असणारे मुंबईतील दादर येथील शिवसेना भवन हे आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यावर अद्याप शिंदे गटाने दावा केलेला नाही. शिंदे यांनी ठाणे येथे पक्षाचे स्वतंत्र मुख्यालय उभे केले आहे. मुंबईत मंत्रालयासमोर बाळासाहेब भवन पक्ष कार्यालय सुरू केले आहे. अजित पवारांना आपल्याबरोबर ३६ पेक्षा जास्त आमदार आहेत हे सिद्ध करून द्यावे लागणार आहे.
एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोघेही ताकदवान मराठा नेते आहेत. शिंदे यांचा प्रभाव ठाणे-पालघर जिल्ह्यावर अधिक आहे. अजितदादांचा प्रभाव पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर जास्त आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, सरकारच कोसळले. अजितदादांच्या बंडानंतर शरद पवार बंडखोर पुन्हा निवडून येणार नाहीत, असे सांगत त्यांच्या मतदारसंघातच सभा घेत आहेत.
शिंदे यांच्या बंडाची कल्पना माध्यमांना शेवटपर्यंत आली नव्हती. गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत महाआघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला तरी सरकारच कोसळेल असे वाटले नव्हते. पण शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी सुरत मार्गे गुवाहटी व गोव्याला कूच केले तेव्हा ठाकरे यांच्या सरकारचे बहुमत गेल्याचे स्पष्ट झाले. अजितदादांच्या बंडाच्या सर्व हालचालींचे केंद्र मुंबईत होते. बंड मुंबईत झाले आणि तत्काळ उपमुख्यमंत्री आणि नऊ मंत्र्यांचा शपथविधीही झाला.
शिंदे यांच्या बंडाचे नाट्य योजनाबद्ध होते. पंचतारांकित हॉटेलमध्ये ५० आमदारांचा पाहुणचार पंधरा दिवस चालू होता. वातानुकूलित खोल्या, मोटारी, विमाने अशा सर्व सुविधा होत्या. अजितदादांवर निष्ठा असणारे आमदार मुंबईत मोकळेपणाने फिरत होते. राष्ट्रवादीचे अनेक बंडखोर आमदार हे आमदार निवासात या काळात मुक्कामाला होते.
शिंदे यांच्या समर्थक आमदारांना उबाठा सेनेच्या पक्ष प्रमुखांनी व प्रवक्त्यांनी गद्दार म्हणून हिणवले. डुक्कर, मिंधे, अशी लाखोली वाहिली, शिंदे गट दिसेल तिथे, अगदी मंगल कार्यात व समारंभातही ‘५० खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा दिल्या. दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांच्या निष्ठावंतांनी अशी कोणतीही हिन दर्जाची भाषा कोणा आमदाराच्या वा मंत्र्यांच्या विरोधात वापरली नाही. शिंदे व ठाकरे दोन्ही गटांना निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात परस्परांच्या विरोधात दाद मागावी लागली. पण आपण बंडखोरांच्या विरोधात कायदेशीर संघर्ष करणार नाही, असे शरद पवारांनी जाहीर करून टाकले. बंडखोरांना राजकीय ताकदीने उत्तर देऊन अशी रणनिती शरद पवारांनी अवलंबिली आहे.
शिंदे यांनी भाजपसोबत सरकारमध्ये जाऊन २०१९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला जनतेने दिलेला कौलच आपण अमलात आणला असे सांगितले. अजितदादा व त्यांची टीम यांनी ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली त्यांच्याच सरकारमध्ये सामील झाली. भाजपसोबत जाण्यापूर्वी शिंदे गटाने जाहीर वाच्यता केली नाही. दुसरीकडे अजितदादा मात्र आपण शेवटच्या श्वास असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असे सांगत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे काय प्रतिज्ञापत्र लिहू देऊ काय, असा उलटा प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला होता.
शिंदे हे ठाकरे सरकारमधून बाहेर पडले आणि स्वत: मुख्यमंत्री झाले. ज्यांच्या मदतीने त्यांनी ठाकरेंना सत्तेवरून हटविण्याचे धाडस केले, त्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. ठाकरे सरकार कोसळल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस वर्षभर विरोधी बाकांवर होती. पण सत्तेशिवाय आपण फार काळ राहू शकत नाही, हे अजितदादांच्या निर्णयाने दाखवून दिले.
टीम शिंदे यांचे आजही टार्गेट उद्धव ठाकरे आहेत. टीम अजितदादांचे टार्गेट शरद पवार आहेत. महाआघाडीच्या काळात ठाकरे कोणाला भेटत नव्हते, मंत्रालयात जातच नव्हते, आता शिंदे, पवार व फडणवीस हे तिघेही नेते सतत गर्दीने वेढलेले दिसतात. तिघेही राज्यभर दौरे करतात. पण तिघेही नोकरशहा, पक्ष कार्यकर्ते व जनतेला वैयक्तिक पातळीवर किती उपलब्ध असतात?
सत्तेवर असताना उद्धव यांनी आदित्य यांना कॅबिनेट मंत्री केले. वडिलांच्या सतत पाठीशी दिसायचे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत एकदम प्रकाशझोतात आले. पितापुत्रांभोवती गर्दी सदैव असली तरी अपॉइंटमेन्ट घेऊन स्वतंत्र भेट मिळणे मुश्कील झाले. पक्षाबाहेरील लोकांशी विशेषत: पत्रकारांशी वैयक्तिक व गटागटाने विविध विषयांवर चर्चा होते असे आता ऐकायलाही येत नाही. गर्दीतून व हारतुऱ्यांच्या ढिगाऱ्यातून काहीही साध्य होत नाही, केवळ फोटो सेशनसाठी जास्त गर्दी असते हे त्यांनाही चांगले ठाऊक असावे.
सत्तेवर असताना पक्षाचे व सरकारचे महत्त्वाचे निर्णय पक्षप्रमुखांची चौकडी घेत होती, कौटुंबिक वर्चस्व वाढले. त्यातून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात असंतोष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना डावलून सुप्रिया यांना जास्त महत्त्व दिले जाऊ लागले, यावरून अजितदादा गटात धुसफूस वाढली. शिवसेनेत आदित्य यांचे वाढणारे प्रस्थ आणि राष्ट्रवादीत सुप्रिया यांना दिलेले महत्त्व यातूनच बंडाची बिजे पेरली गेली.
विशेष म्हणजे आपल्या पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने आपल्याला सोडून भाजपसोबत जाणार हे उद्धव ठाकरे व शरद पवार यांना अगोदरपासून ठाऊक होते. शरद पवारांना पक्षाच्या आमदारांनी ठराव करून स्वाक्षऱ्यांचे पत्र दिले होते. उद्धव ठाकरे यांनाही पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने भाजपसोबत जाणार हे अनेकांनी भेटून सांगितले होते. पण पक्षात उभी फूट पडताना दोघेही नेते आपल्या आमदारांना रोखू शकले नाहीत. भाजपच्या रणनितीपुढे ठाकरे व पवार हतबल झाल्याचे दिसले.