जिल्हयातील रखडलेल्या एसटी आगारांच्या कामांबाबत शासन व प्रशासन सुस्त

रत्नागिरी, चिपळूण, लांजा व पाली आगारांच्या रखलडेल्या कामांना नेमके जबाबदार कोण? सामान्यांचा सवाल

पावसाळयात प्रवाशांची होतेय ससेहोलपट

नरेंद्र मोहिते | राजापूर : रत्नागिरी जिल्हयाला लागून असलेल्या रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हयाचा विकास झपाटयाने होत असताना रत्नागिरी जिल्हा मात्र विकासाच्या आणि प्रगतीच्या बाबतीत दिवसेंदिवस पिछाडीवर पडत आहे. मग रत्नागिरी जिल्हयात रखलडेल्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम असो, की जिल्हयात गेली तीन वर्षे उलटूऊन गेली तरी अपुर्ण असलेली रत्नागिरी, चिपळूण, लांजा व पाली या एसटइ आगारांची कामे असोत. यात सर्वसामान्य जनतेचे मात्र परवड होत असून रत्नागिरी जिल्हयाला कुणी सक्षम नेतृत्व नसल्याने जिल्हावासीयांची ही अवस्था आहे काय असा सवाल आता जनतेतुनच उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम तीन वर्षे होत आली तरी अद्याप पुढे सरकलेले नाही. त्यामुळे भर पावसान प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून गाडयांची प्रतिक्षा करावी लागत आहे. तीच अवस्था चिपळूण मध्यवर्ती स्थानकासह लांजा व पाली आगाराची आहे. या सर्व आगारांच्या रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून या ठिकाणी पडलेले खड्डे, पसरलेले चिखलाचे साम्राज्य यामुळे शालेय विद्यार्थी, महिलावर्ग आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होत आहे. एसटी प्रवासात 75 वर्षावरिल नागरिकांना 100 टक्के मोफत प्रवास आणि महिलांना प्रवासात 50 टक्के सलवतीचा महत्वपुर्ण निर्णय घेत तोटयात असलेल्या एसटीला उर्जीतावस्था देऊ पहाणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हयातील या रखडलेल्या आगारांच्या कामांमध्ये वैयक्तीक लक्ष घालावे आणि जिल्हयातील एसटी प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

रत्नागिरी जिल्हयाला लागून असलेल्या एका बाजुच्या रायगड तर दुसऱ्या बाजुच्या सिंधुदुर्ग जिल्हयाचा झपाटयाने विकास होत आहे. सामाजिक, शैक्षणिक विकासात हे जिल्हे पुढे आहेत. तर औद्योगिक प्रगतीमुळे दरडोई उत्पनातही या जिल्हयांनी बाजी मारली आहे. मात्र आमचा रत्नागिरीच मागे का? असा रत्नागिरी वासीयांचा सवाल आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सिंधुदुर्ग जिल्हयात जवळ जवळ 95 टक्के पुर्ण झाले आहे. पण रत्नागिरीमध्ये वाकेड पासून पुढे अगदी खेड पर्यंत मधला काही भाग सोडता आजही काम अपुर्ण आहे. पुढील वर्षभरात ते पुर्णत्वाला जाण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. मात्र याबाबत शासन आणि प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचे पहावायस मिळत आहे. गणेशोत्सवापुर्वी एक मार्गिका सुरू होणार असे जाहिर करण्यात आले आहे. मात्र एकूणच रस्त्याच्या कामाची अवस्था पहाता ते कितपत शक्य होणार आहे हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे यावर्षीही बाप्पांना आणि त्यांच्या स्वागतासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना याच खडतर महामार्गावरून प्रवास करावा लागणार आहे.

रत्नागिरी जिल्हयात रत्नागिरी मध्यवर्ती एसटी बस स्थानकासह चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक व लांजा व पाली अशा एकूणच चार एसटी आगारांच्या नुतनीकरणांच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. मात्र दोन ते तीन वर्षे उलटली तरी ही कामे पुढे सरकलेली नाहीत. रत्नागिरी व चिपळूण आगाराचे काम मार्गी लागणार, यावर्षी पुर्ण होणार अशा घोषणा करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात कामे पुढे सरकलेली नाहीत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकातील शौचालयात प्रातविधीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसात मोठया प्रमाणावर या ठीकाणी पाणी साचल्याने शौचालयाकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. तर रत्नागिरी मध्यवर्ती स्थानकातुन बाहेर जाणाऱ्या बस या रहाटाघर येथून सुटत असल्याने त्या ठीकाणी जाण्यासाठी नाहक आर्थिक भुर्दंड सहन करून प्रवाशांना जावे लागत आहे. तर अनेक प्रवाशांना, महिलांना मध्यवर्ती स्थानकासमोर भर पावसात उभे राहून गाडयांची प्रतिक्षा करावी लागत आहे. पाली,लांजा स्थानकाचेही काम रखडल्याने या ठिकाणीही प्रवाशांची गैयसोय होत आहे. या दोन्ही आगारांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाली आगारात तर प्रवाशांना उभे रहाण्याचीही व्यवस्था नाही, पालीतील बस स्थानकातील शौचालयासमोर एसटी बस थांबून प्रवाशांची चढ उतार करत आहेत.
या एकूणच परिस्थितीला जबाबदार कोण? शासन प्रशासन की लोकप्रतिनिधी असा सवाल आता जनतेतुन उपस्थित केला जात आहे. विकासाच्या पोकळ बाता आणि पोकळ आश्वासनेच दिली जातात प्रत्यक्षात जनतेशी निगडीत अशा कामांकडे सोयीस्कर डोळेझाक केली जाते असा आरोप प्रवाशांतुन होत आहे. दररोज या चारही स्थानकातुन हजारो प्रवाशी प्रवास करतात पण त्यांच्या सेवा सुविधांचे काय? एकीकडे अनेक शहरांमध्ये अद्ययावत आणि हायटेक अशी बस स्थानके उभी रहात असताना रत्नागिरीतील आगारांची अवस्था मात्र अशी दयनिय आहे. रत्नागिरी व चिपळूण ही सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी आगारे म्हणून ओळखली जातात. मात्र दोन वर्षे उलटूनही काम पुर्ण नाही. रत्नागिरी जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्वच राजकिय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना ही भूषणावह बाब आहे काय याचे आत्मपरिक्षण या लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हायाची झालेली प्रगती ही तेथील खमक्या लोकप्रतिनिधींनी प्रसंगी आंदोलने करून आणि जनतेसाठी लढा उभारून संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची फलश्रृती आहे. मग रत्नागिरीतील लोकप्रतिनिधींना हे कधी कळणार असा जनतेचा सवाल आहे.