लांजा शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

 

भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम राबवण्याची गरज

संतोष कोत्रे | लांजा : लांजा शहरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याकडून १४ जणांना चावा घेऊन जखमी केल्यानंतर लांजा शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे लांजा नगरपंचायतीने अशा भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम राबवण्याची गरज बनली आहे. नगरपंचायत या दृष्टीने ही निर्बिजीकरण करण्याची प्रक्रिया कधी राबवणार ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. नागरिकांच्या या महत्वाच्या प्रश्नावर नगरपंचायतीेने गांभिर्याने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
लांजा शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. १५ ते २० च्या टोळक्याने फिरणारी उनाड, भटकी आणि जखमी झालेली कुत्री ही लांजा वासियांना समोरील एक मोठी समस्या बनून राहिली आहे. आजवर या भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या असून या कुत्र्यांमुळे मोटर सायकल,रिक्षा यासारख्या वाहनांचे छोटे मोठे अपघात देखील झालेले आहेत.

लांजा साटवली रोडवरील पोलीस वसाहत, लांजा साटवली फाटा, लांजा हायस्कूल, लांजा गोंडेसखल रोड, केदारलिंग मंदिर पटांगण ,लांजा शाळा नंबर ५, बस स्थानक, नगरपंचायत ,काळा पूल, कोर्ले तिठा आधी वर्दळ आणि गजबजलेल्या ठिकाणी या भटक्या आणि उनाड कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे.. भटक्या कुत्र्यांचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यापासून शहरात खरेदीसाठी येणारे नागरिक, शाळांमध्ये जाणारी मुले यांना देखील मोठा धोका संभवत आहे. या भटक्या कुत्र्यांनी शहरातील नागरिकांवर यापूर्वी हल्ले केल्याचा आणि त्यांना चावा घेतल्याच्या घटनादेखील यापूर्वी घडलेल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्ग व शहरातील प्रमुख गजबजलेल्या रस्त्यांवर झुंडीने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकी, रिक्षा यासारख्या छोट्या वाहनांचे अनेक अपघात देखील यापूर्वी झालेले आहेत.
त्यामुळे अशा प्रकारे भटक्या कुत्र्यांची पैदास वाढू नये यादृष्टीने त्यांचे निर्बीजीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने लांजा नगरपंचायतीने विशेष खबरदारी घेताना कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम तातडीने राबवण्याची गरज आहे. जेणेकरून कुत्र्यांची पैदास वाढणार नाही. त्यांची संख्या कमी होईल आणि त्यातून पुढील गंभीर प्रसंग उद्भवणार नाहीत. लांजा नागरिकांची ही रास्त मागणी लक्षात घेऊन लांजा नगरपंचायत अशा प्रकारची मोहीम कधी राबवणार हा एक प्रश्न आहे.