लोटे विस्तार टप्पा क्र.२ मधील कार्यक्षेत्रातील कंपनीच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

असगणी ग्रामपंचायतीने दिले म.प्र.नि. म. चिपळूणला निवेदन

चिपळूण (वार्ताहर) : लोटे विस्तारीत टप्पा क्रमांक दोनमध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चालू असलेल्या कंपनीच्या सांडपाण्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अक्वा फुड्स अक्झियम या कंपनीचे काम पूर्ण झाल्याची माहिती प्राप्त झाली असून सांडपाण्याबाबत नियोजन काय? काही काम चालू असताना ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता केल्यामुळे वादग्रस्त आहेत. दुर्गंधी असलेल्या कंपनींना काम चालू करण्यास परवानगी कशी देण्यात आली. याबाबत असगणी ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण याना निवेदन देण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील असगनी गावातील बहुतांशी जमिनी लोटे विस्तारित टप्पा क्रमांक दोनमध्ये हस्तांतरित केलेल्या आहेत. त्यातील काही ग्रामस्थांच्या अजूनही प्रश्न प्रलंबित आहेत. ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण चिपळूण यांच्या मार्फत मार्गी लागलेले नाहीत, असे असतानाही काही कंपन्यांना काम सुरू करण्यासाठी या क्षेत्रामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. यासंबंधी ग्रामपंचायतला कोणतीही कल्पना न देता किंवा विश्वासात न घेता परवानगी देण्यात आलेली आहे. याच विस्तारीत टप्प्यांमध्ये अक्वा अक्झीयम या कंपनीचे काम पूर्ण होऊन मिळालेल्या माहितीनुसार प्रोन्सवर प्रक्रिया करण्याचे काम कंपनीत चालू असल्याचे समजते. परंतु ही प्रक्रिया करण्याची कंपनी असून तयार होणाऱ्या दूषित पाण्याबाबत कंपनीचे नियोजन काय? ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ईटीपीचे प्लांटबाबत काही कामे पूर्ण झालेली नाहीत आणि काही चालू कामे विश्वासच न घेता चालू केल्यामुळे वादाचा मुद्दा समोर येत आहे. अशा वेळेत गावच्या शुद्ध पाण्याचा उगम आहे अशा ठिकाणी सांडपाण्याची आपले काही नियोजन नसताना दुर्गंधीयुक्त असलेल्या कंपनीला प्रॉडक्शन चालू करण्यासाठी परवानगी कशी काय देण्यात आली. याबाबत ग्रामपंचायत असगणी सर्व सदस्य सोबत संयुक्त सभा घेऊन योग्य ते खुलासा द्यावा असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.
सदर कंपनीने सांडपाण्याबाबत केलेल्या नियोजनाबाबत ग्रामपंचायतीला लेखी कळवावे, अन्यथा ग्रामपंचायत ग्रामस्थांना सोबत घेऊन जन उठाव करेल, याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे. अशा निवेदनाचे पत्र असगनी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण येथील अधिकाऱ्यांना दिलेले आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने सदर निवेदन खेर्डी येथील एमआयडीसी मधील अधिकाऱ्यांना सुद्धा दिले आहे. हे निवेदन देताना सरपंच सौ संजना बुरटे, उपसरपंच यासीन घारे, सदस्य चंद्रकांत गोसावी, सुविंद्र धाडवे आणि माजी उपसरपंच संजय बूरटे उपस्थित होते. आता यावर संबंधित अधिकारी कोणत्या प्रकारची कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.