संगित कलेतील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल पुणे येथील आर्ट बिट्स फाऊंडेशनतर्फे गौरव
सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा विजय गोपाळ माधव यांना राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. विजय माधव हे माजगाव म्हालटकरवाडा येथील श्री जयशंभो भजन मंडळात गेल्या ३३ वर्षांपासुन सेवा बजावत आहेत.
विजय माधव यांनी अनेक जिल्हास्तरीय भजन स्पर्धमध्ये आपल्या मंडळाला पारितोषिके मिळवुन देताना स्वतः ही उत्कृष्ट हार्मोनियमवादक, गायक अशी अनेक पारितोषिके पटकावली. विजय माधव यांनी प्रथम तबल्याचे उपांत विशारद पर्यंतचे शिक्षण प्रमोद मुंडये यांच्याकडुन घेतले. त्यानंतर गुरुदास मुंडये यांच्याकडून हार्मोनियम वादन प्रवेशिका पूर्ण केले. सध्या ते सिंधुदुर्गातील भजनरत्न भालचंद्र बुवा केळुसकर यांच्याकडे भजनी कलेचे शिक्षण घेत आहेत.
संगीत क्षेत्रातील हार्मोनियम, तबला, भजन कलेत त्यानी अनेक कलाकार घडविले असुन या कलेच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांचे उल्लेखनिय योगदान आहे. संगीत कलेतील त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
संगीत कलेतील हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे संगीत प्रेमी एच. बी. सावंत, भालचंद्र बुवा केळुसकर, पखवाज विशारद कु. संकेत म्हापणकर, तबला वादक कु. विक्रम कासार आदीसह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.