चांद्रयान मोहिमेनिमित्त गो जो महाविद्यालयात विशेष कार्यक्रम

भारताची अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोची बहुचर्चित तिसरी चांद्र मोहीम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. १४ जुलै रोजी हे चांद्रयान अंतराळात झेप घेईल आणि भारतीय अवकाशभरारीचा एक नवा अध्याय लिहिला जाईल. दि. १४ जुलै रोजी ‘चांद्रयान-३‘ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित होईल. इस्रोच्या एलव्हीएम-३ या रॉकेटच्या मदतीने हे यान चंद्रावर पाठवण्यात येईल.
या अभूतपूर्व घटनेचा जनमानसात वैज्ञानिक दृष्टीकोणातून प्रचार व्हावा या साठी या प्रसंगाचे औचित्य साधून गोगटे जोगळकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राने एका नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी महाविद्यालयात चंद्रयान-3 चे प्रत्यक्ष प्रक्षेपण मोठ्या स्क्रीन वर दाखविण्यात येणार असून तत्पूर्वी दुपारी दोन वाजता या मोहिमेविषयीच्या वैज्ञानिक माहितीचे सादरीकरण पॉवरपॉईंट माध्यमातून करण्यात येणार आहे. हा उपक्रम सर्वांसाठी नि:शुल्क असून रत्नागिरीतील विज्ञानप्रेमी नागरिकांनी व विद्यार्थ्यानी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयद्वारे करण्यात येत आहे.