मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मंजिरी परब यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोलगांव येथील श्री सातेरी कोलगाव ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे सल्लागार व मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते गुरुनाथ परब यांच्या पत्नी सौ. मंजिरी गुरुनाथ परब यांचे बुधवारी निधन झाले. निधना समयी त्या ६३ वर्षांच्या होत्या.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी शिवसेना पक्षांतर्गत समाजसेवेत स्वतःस झोकून दिले. जोगेश्वरी येथील मजासवाडी परिसरातून त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची शिवसेनाप्रमुखानी दखल घेवून त्यांना २०१२ साली मजास वाडी वॉर्ड क्रमांक ७३ मधून पक्षातर्फे नगरसेविका म्हणून उमेदवारी दिली. त्यांचे काम आणि उत्तम जनसंपर्क या गुणांवर त्या निवडूनही आल्या. सन २०१२ ते २०१७ या कालावधीत त्या वॉर्ड क्र. ७३ च्या नगरसेविका होत्या. त्यांच्या या कामात त्यांचे पती गुरुनाथ परब यांची त्यांना सकारात्मक साथ लाभली.श्री सातेरी देवीवर त्यांची अपार श्रद्धा होती. आपल्या कोलगावच्या श्री सातेरी देवी मंदिराच्या जीर्णोद्धार करताना त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

मुंबई आणि कोलगाव या दोन्ही मंडळाच्या त्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत अलिकडेच १ मे रोजी श्री सातेरी कोलगाव ग्रामस्थ मंडळ, मुंबई व कोलगाव यांच्यावतीने त्यांचा कोलगाव ग्रामस्थ स्नेहसंमेलनात विशेष सत्कार देखील करण्यात आला होता.मुंबई व कोलगाव येथील दोन्ही मंडळ व समस्त कोलगाववासीयांनी त्यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केला असून परब कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करताना त्यांच्याप्रती मंडळाच्या वतीने तसेच समस्त गाव असे यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा मुंबई येथील निवासस्थानावरून निघणार असून लिंक रोड स्मशानभूमी प्रताप नगर जोगेश्वरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.