जनसंवाद अंतर्गत विजयदुर्ग पोलीसांचा उपक्रम

विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) विजयदुर्ग कोस्टल पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून हेमंत देवरे यांची नव्याने नियुक्ती झाल्यावर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी शासनाच्या वतीने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जनसंवाद अंतर्गत विजयदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील पडेल येथे नुसतीच ज्वेलर्स, टेंपो रिक्षा चालक मालक तसेच व्यापारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांना सीसीटिव्ही कॅमेरा, अलार्म सिस्टीम बसवण्याबाबत तसेच दुकानात जास्त रोख रक्कम व मौल्यवान वस्तू न ठेवण्यासंदर्भात सुचना करण्यात आल्या. दरम्यान, संशयीत व्यक्ती फिरताना अगर दुकानाच्या आसपास दिसल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळविण्यात यावे असं आवाहन यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांनी केले. वाहनधारकांना अतिवेगाने वाहन न चालविण्याच्या सुचनाही यावेळी करण्यात आल्या. सर्व व्यावसायिकांनी यावेळी पोलीसांना सहकार्याचे आश्वासन दिले.