राजापूर update : झाड पडून गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ तीन महिलांना रत्नागिरीत हलविले

राजापूर | प्रतिनिधी : शहरात बंदरधक्का-गणेशविसर्जन घाट परिसरात गुरूवारी भरलेल्या आठवडा बाजारात या ठिकाणी असलेला गुलमोहराचा वृक्ष अचानकपणे उन्मळून कोसळल्याने आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका ग्राहकाचा दुदैवी मृत्यु झाला आहे. तर यामध्ये आठवडा बाजारात विक्रीसाठी बसलेल्या तीन मच्छीमार महिला विक्रेत्या गंभीर जखमी झाल्या आहेत. गुरूवारी सायंकाळी 4.30 ते 4.45 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत रामचंद्र बाबाजी शेळके 48 रा. बारसू खालचीवाडी हे जागेवरच ठार झाले असून मुमताज आसिफ फणसोपकर वय 48, यास्मिन शौकत कोतवडकर वय 35 व सायका इरफान पावसकर वय 55 रा. मधीलवाडा कावन या जखमी झाल्या आहेत. त्यांना राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.

अचानकपणे हा वृक्ष उन्मळून कोसळून खाली पडल्याने बाजारात एकच हाहाकार उडाला. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी पळापळ केली. मात्र तरीही यामध्ये एकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. गुरूवारी सांयकाळी राजापूर शहर व तालुका परिसरात वाऱ्यासह पाऊस झाला. याच कालाधीत हे झाड कोसळले आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ तहसीलदार शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपीक जितेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष जमिर खलिफे, माजी नगरसेवक सुलतान ठाकूर, सुभाष बाकाळकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर आदींसह व्यापारी व नागरिकांनी आठवडा बाजारात धाव घेतली. तर जखमींना तात्काळ उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दर गुरूवारी राजापूर शहरात बंदरधक्का, गणेशविसर्जन घाट परिरसत आठवडा बाजार भरतो. भाजीपाल्यासह अन्य वस्तु स्वस्त दरात उपलब्ध होतात म्हणून कायमच शहरासह ग्रामीण भागातील ग्राहक या बाजारात खरेदीसाठी गर्दी करतात. गुरूवारी सायंकाळी 4.30 ते 4.45 वाजता अचानकपणे या ठिकाणी पवार यांच्या चायनिज दुकानाच्या बाजुला असलेला गुलमोहराचा वृक्ष अचानकपणे उन्मळून खाली कोसळला. यात या ठिकाणी एका व्यापाऱ्याकडे खरेदी करत असलेल्या शेळके यांच्या तो अंगावर पडल्याने त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. तर मच्छीविक्रीसाठी बसलेल्या या तीन महिलाही या वृक्षाखाली आल्याने त्यांच्या डोक्याला व अन्य ठीकाणी मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत.

याबाबत नगर परिषद प्रशासनाला माहिती मिळताच न. प. चे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांसह कर विभागाचे अविनाश नाईक, बांधकाम विभागाचे संजीव जाधव, आरोग्य विभागाचे महाडीक, संदेश जाधव आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कोसळलेला वृक्ष बाजुला करण्याचे काम हाती घेतले. तर जखमींना तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठीकाणी डॉ. शर्मा व डॉ. मिना यांसह कर्मचाऱ्यांनी यांनी त्यांच्यावर उपचार केले.

मुख्याधिकारी प्रशांत भोसलेंसह माजी नगराध्यक्ष जमिर खलिफे, सुलातन ठाकूर यांसह रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार, पराग चिंबुलकर, आजीम जैतापकर अनेकांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. तर राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी भेट दिली व त्यानंतर रूग्णालयात जखमींची विचारपूस केली. यात शेळके यांचा मृत्यु झाला असून तीन महिला जखमी झाल्या आहेत. याबाबत आपत्ती कक्षालाही माहिती देण्यात आल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

झाडाखाली अडकलेल्यांना काहींना न. प. कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले

अचानकपणे झाड कोसळल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. मात्र नेहमीप्रमाणे आठवडा बाजारात स्वच्छता व अन्य कामासाठी असलेले नगर परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे कर्मचारी राजा जाधव, संदीप जाधव, संदेश जाधव, नितेश जाधव यांसह अन्य यांनी तातडीने या झाडाखाली अडकलेल्या अनेकांना सुखरूप बाहेर काढले. तर गंभीर जखमींना तातडीने रूग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले.

बाजारात खरेदी करताना शेळकेंवर काळाचा घाला

रामचंद्र बाबाजी शेळके हे रिक्षा व्यावसायिक आहेत. ते बाजारात कांदे बटाटे खरेदी करण्यासाठी तेथील कांदा बटाटा विक्रेत्यांकडे गेले होते. तेथे खरेदी करत असताना अचानक हा वृक्ष कोसळला व त्यांच्या बुंध्याखालीच शेळके हे चिरडले गेले व त्यांचा जागीच मृत्यु झाला. यावेळी कांदा बटाटे विक्रेत्याच्या अवघ्या एका फुटावर हे झाड पुढे पडल्याने तो बालंबाल बचावला आहे. मात्र शेळके यांच्या दुदैवी मृत्युने बारसु गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या या दुदैवी मृत्युची बातमी कळताच राजापूर शहरातील रिक्षा संघटना पदाधिकारी व रिक्षा चालकांनी रूग्णालयात धाव घेतली.