बांदा पानवळ येथील मोरी पूलालगतचा भराव खचल्याने रस्ता धोकादायक

बांदा – दोडामार्ग राज्यमार्गावरील परिस्थिती

बांदा (प्रतिनिधी) : बांदा – दोडामार्ग राज्यमार्गावर बांदा पानवळ येथील मोरी पूलालगतचा मातीचा भराव खचल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने गॅस पाईपलाईनसाठी रस्त्यालगत खोदाई केल्याने धोका वाढला आहे. एमएनजीएल कंपनीच्या खोदाई कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.
एमएनजीएल कंपनीने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यालगतच खोदाई केली होती. पावसाळ्यात रस्ता खचण्याचा धोका अनेक लोकप्रतिनिधींनी आधीच निदर्शनास आणून दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग तर पूर्णपणे निद्रीस्त होता. स्थानिकांच्या सुचनांकडेही दुर्लक्ष करण्यात आले. या रस्त्यालगत वाहने हाकणे जिकरीचे व धोकादायक बनले आहे.
पानवळ येथील मोरी पूलाजवळील भरावाचे काम संबंधित कंपनीकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. संरक्षक भिंत न उभारताच हे काम करण्यात आले होते. एमएनजीएल कंपनीसह बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.