कोमसापच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी आनंद शेलार

सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी श्री. आनंद शेलार यांची केंद्रीय समितीने निवड केल्याचे जाहीर केले. कोकण विभागातील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्याकडून विविध अंगी साहित्य लेखन व्हावे या हेतूने पद्मश्री श्री. मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे स्थापना केली आहे.या संस्थेवर श्री. आनंद शेलार यांची नुकतीच निवड करण्यात आली असून केंद्रीय अध्यक्ष सौ. नमिता कीर व केंद्रीय कार्यवाह श्री. माधव अंकलगे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. आनंद शेलार हे स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस या शाळेत गेली ३७ वर्ष अध्यापनाचे काम करत असून प्रशालेतील विविध शैक्षणिक उपक्रमांक बरोबरच त्याने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. तसेच सध्या ते विविध संघटनांवरती कार्यरत असून पावस ग्रामपंचायत मध्ये तंटामुक्ती सदस्य म्हणून ते काम करत आहेत.

रत्नागिरीतील पहिल्या रत्नागिरी दर्शन या पुस्तकाचे त्यांनी सुदेश बेर्डे यांच्यासोबत संपादन आणि प्रकाशन केलेले असून अनेक वृत्तपत्रांमधून त्यानी प्रासंगिक लेखन केलेले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. साहित्य चळवळ अखंड सुरू ठेवण्यासाठी त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. कवी केशव सूत स्मारक मालगुंड येथे निवडणूक घेण्यात आली, यासाठी निरीक्षक म्हणून श्री. गजानन कमलाकर पाटील यांनी काम पाहिले.

यावेळी विश्वस्त श्री अरुण नेरूरकर, केंद्रीय कार्यवाहक माधव अंकलगे उपस्थित होते तसेच दादा कदम, राजेश गोसावी, युयुत्सु आर्ते, पत्रकार प्रमोद हर्डीकर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या संस्थेचे संस्थापक माननीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, विश्वस्त श्री. रमेश कीर, रेखाताई नार्वेकर, केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्यवाहक माधव अंकलगे, कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी व इतर कार्यकारणी सदस्य यांनी श्री. आनंद शेलार यांचे अभिनंदन केले आहे.