वृक्ष कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रामचंद्र शेळके यांच्या वारसांना राजापूर न. प. कडून 25 हजाराची आर्थिक मदत जाहीर

जखमी महिलांना प्रत्येकी पाच हजाराची मदत जाहीर
महसूल प्रशसनाकडूनही आर्थिक मदतीसाठीचा शासनाकडे प्रस्ताव सादर

राजापूर | प्रतिनिधी : शहरात आठवडा बाजारात वृक्ष कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रामचंद्र बाबाजी शेळके 48 रा. बारसू खालचीवाडी यांच्या वारसांना ताडतीने शासकिय मदत देण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव पाठवीला आहे. राजापूर नगर परिषदेच्या वतीने तातडीची मदत म्हणून मृत शेळके यांच्या कुटुंबीयांना 25 हजार तर तीनही जखमी महिलांना उपचारासाठी प्रत्येकी पाच हजाराची मतद जाहीर करण्यात आली आहे. तशी माहीती नगर परिषदेच्या प्रशासक व प्रांताधिकारी वैशाली माने व मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे. तर महसूल प्रशासनाच्या वतीने शासनाच्य नियमाप्रमाणे चार लाख रूपये मतदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी दिली आहे.

शहरात बंदरधक्का-गणेशविसर्जन घाट परिसरात गुरूवारी 13 जुलै रोजी भरलेल्या आठवडा बाजारात या ठिकाणी असलेला गुलमोहराचा वृक्ष अचानकपणे उन्मळून कोसळल्याने आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेले रामचंद्र बाबाजी शेळके 48 रा. बारसू खालचीवाडी हे जागेवरच ठार झाले होते. तर मुमताज आसिफ फणसोपकर वय 48, यास्मिन शौकत कोतवडकर वय 35 व सायका इरफान पावसकर वय 55 रा. मधीलवाडा कावन या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले होते, त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.