दापोली (प्रतिनिधी) दापोली येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठया उत्साहात पार पडले.
यावेळी मनसेचे नेते माजी आम. बाळा नांदगावकर, मनसे नेते माजी आम.नितिन सरदेसाई, मनसे नेते ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर, सचिन गायकवाड, नितिन साठे, साईराज देसाई यांच्यासह दापोली तालूक्यातील विविध ठिकाणचे मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे दापोली येथील जनसंपर्क कार्यालय पथिक हाॅटेलच्या मागे श्री काॅम्प्लेक्स येथे नव्याने सुरू करण्यात आले. या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभाच्या उद्घाटनाच्या औपचारिकतेची फित महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते कापण्यात आली. यावेळी मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. उद्घाटनाची औपचारिकता पार पडताच राज ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो राजसाहेब ठाकरे जैसा हो. जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशाप्रकारच्या घोषणांनी अवघे दापोली शहर दुमदुमून गेले. राज ठाकरे यांच्या भेटीने मनसैनिकांच्या चेह-यावर समाधानाचे भाव दिसत होते. यावेळी महिला मनसैनिकही मोठया संख्येने उपस्थित होत्या त्यांचाही उत्साह ओसंडून वहात होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दापोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.











