पुणे : मराठी चित्रपट सुष्टीतील देखणा अभिनेता म्हणून ओळख असलेले रवींद्र महाजनी यांचा धक्कादाय मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आलेली आहे. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
रवींद्र महाजनी यांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईचा फौजदार, देऊळ बंद, पानिपत व इतर अनेक सिनेमांमध्ये रवींद्र महाजनी यांनी भूमिका साकारून सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मराठी चित्रपट सृष्टीमधील देखणा, रुबाबदार नट अशी रवींद्र महाजनी यांची ओळख होती. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे ते वास्तव्यास असलेल्या बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून शुक्रवारी संध्याकाळी देण्यात आली. (Marathi actor Ravindra Mahajani passed away, body found in locked room)
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तब्येतीच्या कारणामुळे पुण्यामध्ये वास्तव्यास होते. पुण्यातील मावळमध्ये असलेल्या तळेगाव एमआयडीसी परिसरातील आंबी गावात एका सोसायटीमध्ये महाजनी हे सात ते आठ महिन्यांपासून भाड्याने राहत होते. या सोसायटीमध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये ते एकटेच वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यांच्या फ्लॅटमधून शुक्रवारी दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांना संशय आला. यानंतर त्यांनी या घटनेबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी धाव घेऊन फ्लॅट उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने अखेर पोलिसांकडून फ्लॅटचा दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिसांना आढळला.
धक्कादायक बाब म्हणजे रवींद्र महाजनी यांचा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी यांना याबाबत कळवले. त्यानंतर गश्मीर यांनी तत्काळ पुण्यामध्ये धाव घेत वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आज पोस्टमार्टम केल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.