श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे ५ नोव्हेंबर रोजी दीपोत्सवाची सांगता

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई

गणपतीपुळे:
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री लंबोदरच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या संपूर्ण कालावधीत नित्यनेमाने सायंकाळी संपन्न होणाऱ्या दीपोत्सवाची सांगता ५ नोव्हेंबर २०२५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभदिनी होणार आहे.
या विशेष दिवशी श्रींचा गाभारा, मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावरील “मोरया” या ठिकाणचे त्रिपुर यांची विधिवत पूजाअर्चा केली जाईल. त्यानंतर असंख्य तेल वातीच्या दिव्यांनी, पणत्यांनी आणि समयांनी सर्व परिसर प्रकाशमय केला जाणार आहे.
सायंकाळी ठीक सात ते साडेसात या वेळेत अशा या भक्तिमय आणि तेजोमय वातावरणात श्रींची सामूहिक आरती, मंत्रपुष्पांजली आणि प्रार्थना अशा स्वरूपाचा विलोभनीय आणि उत्साहवर्धक कार्यक्रम पार पडणार आहे.
या भव्य सोहळ्यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे मंदिर ट्रस्ट यांनी प्रतिवर्षाप्रमाणे उत्तम नियोजन केले असून यामध्ये असंख्य भक्तगण, ग्रामस्थ आणि पर्यटक सहभागी होतात. संस्थान श्री देव श्रीक्षेत्र गणपतीपुळे चे मुख्य पुजारी श्री अमित प्रज्ञा प्रभाकर घनवटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देखील अशा या भक्तीमय सोहळ्याची साक्ष होण्यासाठी सर्व भक्तगणांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.